Latest

Aatmanirbharta in defence | आत्मनिर्भर भारत! पीएम मोदी कर्नाटकातील हेलिकॉप्टर कारखाना ६ फेब्रुवारीला राष्ट्राला समर्पित करणार

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी (Aatmanirbharta in defence) मोदी सरकारने आणखी एक पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ फेब्रुवारी रोजी कर्नाटकातील तुमकूर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा (HAL) हेलिकॉप्टर कारखाना राष्ट्राला समर्पित करतील. हा ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर कारखाना ६१५ एकर जागेवर असून तो देशाच्या सर्व हेलिकॉप्टरशी संबंधित गरजांसाठी वन-स्टॉप सोल्युशन बनवण्याच्या दृष्टीकोनातून उभारण्यात आला आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

३ ते १५ टन वजनाच्या १ हजारहून अधिक हेलिकॉप्टरचे उत्पादन घेण्याची एचएएलची योजना आहे. यामुळे २० वर्षांच्या कालावधीत एकूण ४ लाख कोटी रुपयांची उलाढाल होईल, असेही संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. तुमकूर येथील हेलिकॉप्टर कारखान्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. त्यासोबतच CSR उपक्रमांच्या माध्यमातून आजूबाजूच्या क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल, असेही नमूद करण्यात आले आहे.

तुमकूर येथील ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर कारखाना हा भारतातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर उत्पादन सुविधा असलेला प्रकल्प आहे आणि सुरुवातीला त्यात लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर्सची (LUHs) निर्मिती केली जाणार आहे. LUH हे स्वदेशी बनावटीचे विकसित केलेले ३-टन श्रेणीचे, सिंगल इंजिन असलेले बहुउद्देशीय युटिलिटी हेलिकॉप्टर आहे. ज्यामध्ये उच्च कौशल्याची अद्वितीय वैशिष्ट्ये आहेत. सुरुवातीला, हा कारखाना वर्षाला सुमारे ३० हेलिकॉप्टर तयार करेल आणि टप्प्याटप्प्याने ६० आणि नंतर ९० पर्यंत क्षमता वाढवली जाणार आहे. पहिल्या LUH ची उड्डाण चाचणी केली आहे आणि ते उड्डाणासाठी सज्ज आहे. (Aatmanirbharta in defence)

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT