Latest

Lok Sabha Elections 2024 | शिवराज सिंह चौहान यांना केंद्रात मिळणार मोठी जबाबदारी, PM मोदींने दिले संकेत

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले भाजपचे दिग्गज नेते शिवराज सिंह चौहान पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात एंट्री करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे संकेत दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच एका निवडणूक प्रचार सभेत, "त्यांना दिल्ली (केंद्रात) येथे घेऊन जायचे आहे" असे म्हटले. (Lok Sabha Elections 2024)

२००५ ते २०२३ दरम्यानच्या कालावधीत मुख्यमंत्री राहिलेले चौहान हे विदिशा येथून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. विदिशा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. येथे चौहान यांच्याविरोधात काँग्रेसने प्रताप भानू शर्मा यांना रिंगणात उतरवले आहे. १९८० आणि १९८४ मध्ये आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांचा झालेला विजय आणि नंतर त्यांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर काँग्रेसने ही जागा जिंकली होती.

२४ एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील हरदा येथे एका प्रचार सभेत संबोधित करताना पीएम मोदी यांनी शिवराज सिंह चौहान यांचे कौतुक केले. पक्ष संघटन असो या मुख्यमंत्री म्हणून आम्ही सोबत काम केले. जेव्हा शिवराज संसदेत गेले होते. तेव्हा मी सरचिटणीस म्हणून काम करत होतो. आता पुन्हा त्यांना दिल्लीला घेऊन जायचे आहे, असे पीएम मोदी यांनी म्हटले.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मध्य प्रदेशात दणदणीत विजय मिळवला. राज्यातील भाजपच्या या यशात शिवराज सिंह चौहान यांचे महत्त्वाचे योगदान राहिले. त्यांची विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली नव्हती. भाजपने सर्वाना आश्चर्याचा धक्का देत मोहन यादव यांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान केले.

आता शिवराज सिंह चौहान सहाव्यांदा विदिशा येथून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. विदिशाचे ते पाच वेळा खासदारही राहिले आहेत. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी (१९९१), सुषमा स्वराज (१९९१, २००९ आणि २०१४) या भाजपच्या दिग्गज नेत्यांनी विदिशा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. रामनाथ गोयंका १९७१ मध्ये येथून निवडून आले होते.

त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर चौहान म्हणाले की, ही जागा वाजपेयींनी त्यांना दिली होती आणि २० वर्षांनंतर त्यांना पुन्हा येथून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे.

चौहान यांना लोकसभेच्या रिंगणात का उतरवले?

ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय निरीक्षक रशीद किडवई यांनी पीटीआयशी बोलताना म्हटले आहे की, भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दबावामुळे चौहान यांना या जागेवरून उभे करण्यास भाग पाडले. "हे उघड गुपित आहे की शिवराज चौहान यांची लोकप्रियता तपासून पाहण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण आरएसएस आणि महिला मतदारांच्या दबावाखाली भाजपने माजी मुख्यमंत्री चौहान यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला," असे किडवई म्हणाले.

"ते मोठ्या मतफरकाने जिंकण्याची शक्यता आहे. खरं तर, जर ते राज्यातून अथवा राष्ट्रीय स्तरावर सर्वात मोठ्या फरकाने जिंकले, तर ते एक चर्चेचा मुद्दा बनण्याची शक्यता आहे आणि त्यांची तुलना वाराणसी, गांधीनगर, लखनौ आणि अन्य ठिकाणांच्या मत फरकाशी केली जाईल," असेही किडवई यांनी पुढे नमूद केले. दरम्यान, चौहान हे पीएम मोदी-अमित शहा यांच्या व्यवस्थेमध्ये कसे फिट बसतात हे पाहणे केवळ बाकी आहे, असेही किडवई यांनी ठामपणे सांगितले.

विदिशा लोकसभा मतदारसंघातील आठपैकी सात विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे वर्चस्व आहे. मध्य प्रदेशातील विधानसभेत चौहान हे २००६ पासून बुधनी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT