Latest

राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल PM मोदींनी केले पुतिन यांचे अभिनंदन

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रशियाच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल व्लादिमीर पुतिन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. ( PM Modi congratulates Putin )

आगामी वर्षांमध्ये भारत आणि रशिया यांच्यातील विशेष धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक असल्‍याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्‍या शुभेच्‍छा संदेशात म्‍हटले आहे. ( PM Modi congratulates Putin )

पुतिन पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष

रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला आहे. पुतिन यांनी सुमारे ८८ टक्के मतांनी विक्रमी विजय मिळवून सत्तेवर त्यांची आधीची घट्ट पकड मजबूत केली. पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत.२००० मध्‍ये झालेल्‍या राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणुकीत व्लादिमीर पुतिन हे पहिल्‍यांदा रशियाचे अध्‍यक्ष झाले.

आता पुन्‍हा एकदा रशियातील सत्तेची सूत्रे पुढील सहा वर्षांसाठी आपल्‍याकडे ठेवण्‍यात पुतिन यशस्‍वी झाले आहेत.प्रकृती अस्वास्थ्यामुळे बोरिस येल्तसिन यांनी १९९९ मध्ये रशियाची सत्ता व्लादिमीर पुतिन यांच्याकडे सोपवली. यानंतर २००४, २०१२ आणि २०१८ मध्‍ये झालेल्‍या राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणुकांमध्‍ये सत्ता अबाधित ठेवण्‍यात त्‍यांना यश आले होते. आजच्‍या  विजयासह पुतिन यांना ६ वर्षांचा नवीन कार्यकाळ मिळाला आहे. रशियामध्ये सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याच्या बाबतीत त्यांनी जोसेफ स्टॅलिन यांना मागे टाकले आहे. रशियाचे सर्वात जास्त काळ राष्ट्रप्रमुख राहण्याचा विक्रम पुतिन यांच्या नावावर आहे.

रशियामध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय निवडणुका अत्यंत नियंत्रित वातावरणात पार पडल्या. पुतिन यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी ॲलेक्सी नवलनी यांचा गेल्या महिन्यात आर्क्टिक तुरुंगात मृत्यू झाला. त्यांचे इतर विरोधक तुरुंगात आहेत. पुतिन यांच्या विरोधात तीन प्रतिस्पर्ध्यांनी निवडणूक लढवली. मात्र तिघांनीही पुतिन यांच्या २४ वर्षांच्या राजवटीवर किंवा युक्रेनविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईवर टीका करणे टाळले होते.

८० लाखांहून अधिक मतदारांनी केले ऑनलाइन मतदान

रशियाच्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या राष्ट्राध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीत ८० लाखांहून अधिक मतदारांनी ऑनलाइन मतदान केले. रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदानाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुतिन यांनी मॉस्कोमधील विजयी भाषणात समर्थकांना सांगितले की, "ते युक्रेनमध्ये रशियाचे विशेष लष्करी ऑपरेशन म्हणून संबोधित केलेल्या कामांशी संबंधित निराकरणास प्राधान्य देतील. रशियन सैन्य मजबूत करतील. आमच्यासमोर अनेक कामे आहेत. आम्हाला धमकावण्याचा, दडपून टाकण्याचा प्रयत्न करणारे इतिहासात कधीही यशस्वी झाले नाहीत. भविष्यातही कधी यशस्वी होणार नाहीत," असे ते म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT