Latest

मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य उगवेल : पंतप्रधान मोदी

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  मणिपूरसह संपूर्ण ईशान्य भारत आमच्यासाठी 'जिगर का टुकडा' आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे सारे प्रयत्न सुरू आहेत. मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य उगवेल, अशी ग्वाही देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.

ईशान्य भारतातील सार्‍या समस्यांचे मूळ काँग्रेसच आहे, काँग्रेसचा इतिहास देश तोडण्याचा आहे, या शब्दांत हल्ला चढवला. लोकसभेत दोन तास 13 मिनिटांच्या आपल्या भाषणात पंतप्रधानांनी विरोधकांचे सारे आरोप खोडून काढत सडेतोड उत्तर दिले. मणिपूरच्या विषयाचा राजकारणासाठी वापर करू नका, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना ठणकावले. पण प्रारंभीच्या दीड तासांच्या भाषणात मोदी मणिपूरवर काहीच न बोलल्याने विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर मोदी यांनी विरोधकांवर तिखट हल्ला चढवला. मोदी यांच्या भाषणानंतर सभागृहाने आवाजी मतदानाने विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळला. त्याआधी काँग्रेसचे नेते अधिररंजन चौधरी यांना पंतप्रधानांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे निलंबित करण्यात आले.

गेल्या तीन दिवसांपासून लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर जोरदार चर्चा सुरू होती. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेला उत्तर दिले. आपल्या घणाघाती भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभापासूनच काँग्रेस आणि विरोधकांवर कडाडून हल्ला चढवला. विविध विषयांवर भाष्य करत त्यांची टोलेबाजी सुरू होती. दीड तासांच्या भाषणात मोदी मणिपूरबाबत बोलत नसल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला. मोदी यांचे भाषण सुरू असतानाही विरोधक मणिपूरच्या विषयावरून घोषणाबाजी करत होते. सभात्याग करणार्‍या विरोधकांना बघून मोदी म्हणाले की, विरोधकांचे हेच काम आहे. कचरा फेका, खोटे बोला आणि पळ काढा, त्यांच्यात ऐकण्याची हिंमत नाही. काल अमित शहा यांनी मणिपूरबाबत सविस्तर सांगितले. पण विरोधक चर्चेपासून पळत आहेत. मणिपूरसह संपूर्ण ईशान्य भारत आमच्यासाठी 'जिगर का तुकडा' आहे. सरकार मणिपूरमध्ये शांती स्थापन करण्याचे पुरेपूर प्रयत्न करीत आहे. दोषींना कदापि सोडणार नाही. निश्चिंत राहा, मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य निश्चित उगवणार आहे. मी मणिपूरच्या नागरिकांना सांगू इच्छितो की, अवघा भारत त्यांच्यासोबत आहे.

प्रश्नाचे मूळ काँग्रेसमध्ये

काँग्रेसने कधी ईशान्य भारताच्या भावना समजूनच घेतल्या नाहीत. मी 50 वेळा ईशान्य भारताचा दौरा केला. हा निव्वळ आकडा नाही. हे ईशान्य भारताप्रती असलेले समर्पण आहे. जेव्हा सारे काही दहशतवादी संघटना सांगतील तसे होत होते तेव्हा तेथे कोणाचे सरकार होते, जेव्हा सरकारी कार्यालयांत महात्मा गांधी यांचे फोटो लावायलाही बंदी होती तेव्हा मणिपूरमध्ये कोणाचे सरकार होते, जेव्हा शाळांत राष्ट्रगीत गाण्याला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हा मणिपूरमध्ये कुणाचे सरकार होते? ईशान्येकडील राज्यांच्या समस्येचे मूळ काँग्रेसचे शासन आहे. ईशान्य भारताचा विकास होणार नाही याची खबरदारी माजी पंतप्रधान नेहरू यांनी घेतल्याची टीकाही मोदी यांनी केली.

भारतमातेच्या मृत्यूची कामना यापेक्षा दुसरे मोठे दुर्भाग्य नाही

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या करण्यात आली असल्याची टीका केली होती. त्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, काही लोकांनी संसदेत भारतमातेच्या हत्येची कामना केली. यापेक्षा दुसरी दुर्भाग्यपूर्ण गोष्ट कोणती असू शकेल. या लोकांच्या मनातले बाहेर आले आहे. याच काँग्रेसने 1947 मध्ये देशाचे तीन तुकडे केले. ज्या वंदे मातरम गाण्याने प्रेरणा दिली, त्या गाण्याला तुष्टीकरणाच्या राजकारणाद्वारे तोडले गेले. 'भारत तेरे तुकडे होंगे…' असे म्हणणार्‍या टोळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे लोक जातात; तर सिलिगुडी कॉरिडॉर तोडण्याची भाषा करणार्‍यांना समर्थन दिले जाते.

देशाचे मंगल होत असताना काळे कपडे

21 व्या शतकाचा हा कालखंड असा आहे की, जो भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या कालखंडाचा प्रभाव आगामी एक हजार वर्षांपर्यंत राहणार आहे. त्यामुळे आपला सारा जोर विकासावर ठेवणे गरजेचे आहे. संकल्पापासून ते सिद्धीपर्यंत झटणे आवश्यक आहे. मात्र विकासाच्या यात्रेत सामील होण्याऐवजी विरोधक जनतेचा आत्मविश्वास तोडण्याचे काम करीत आहेत. एकीकडे देशाचे मंगल होत असताना तुम्ही काळे कपडे घालून संसदेत येता. कोणत्याही चांगल्या गोष्टीवेळी काळा टिका लावला जातो. तसे तुम्ही चांगल्या कामावेळी काळा टिका लावत आहात, हेही थोडके नाही.

सरकारच्या प्रत्येक कामाची टिंगल केली

पंतप्रधान मोदी म्हणाले की, सारे काही जादूच्या कांडीने होईल, असे काँग्रेसला वाटते. पण तसे नाही. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. सरकारच्या प्रत्येक कामावर तुम्ही हसला, त्याची टिंगल उडवली. स्वच्छ भारत, महिलांसाठी शौचालये, जनधन खाती उघडणे, स्टार्टअप इंडिया योजना, योग-आयुर्वेद अशा सर्व बाबींची टिंगल केली गेली. डिजिटल इंडिया मोहीम आणली गेली, तेव्हा देशातले लोक अशिक्षित आहेत, त्यांना मोबाईल चालवायला येत नाही, असे म्हटले गेले. पण डिजिटलबाबतीत भारत वेगाने वाटचाल करीत आहे. मेक इन इंडियाची थट्टा उडवली गेली. खरे तर काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचा देशाच्या सामर्थ्यावर कधी विश्वासच नव्हता, असे मोदी म्हणाले.

काँग्रेसचा विश्वास पाकिस्तानवर

पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसचा विश्वास कोणावर होता तर तर पाकिस्तानवर. दहशतवादी खुलेआम येत होते, दहशतवादी हल्ले करीत होते. पाकिस्तानने 'आम्ही नाही केले…' असे म्हटल्यावर त्याच्यावर डोळे झाकून विश्वास केला जात असे. एकाचवेळी हल्ले आणि चर्चा होत असत. काश्मीर जळत असताना हुरियत कॉन्फरन्स आणि फुटीरतावाद्यांसोबत चर्चा केली जात होती. आमचे सरकार आल्यानंतर हे सारे बदलले. हल्ले झाल्यावर सर्जिकल आणि एअर स्ट्राईक करण्यात आले. पण यांचा लष्करावरच विश्वास नाही. भारताच्या विरोधातील बाब हे त्वरित पकडून जगभरात देशाची बदनामी करतात. देशाला बदनाम करण्यात यांना आनंद येतो.

2028 ला भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था

विरोधी पक्षांनी देशाच्या आर्थिक स्थितीबाबत आणि अर्थव्यवस्थेबाबत केलेल्या टीकेवर कठोर प्रहार करीत मोदी म्हणाले की, 2014 च्या आधी भारत जगाच्या अर्थव्यवस्थेत 10 व्या, 11 व्या, 12 व्या स्थानावर होता. पण 2014 नंतर आजपर्यंत भारत पाचव्या स्थानापर्यंत पोहोचला आहे. मला खात्री आहे की, जेव्हा तुम्ही 2028 मध्ये अविश्वास प्रस्ताव आणाल तेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली असेल. आज देशात गरिबी वेगाने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत देशातील साडेतेरा कोटी लोक गरिबीतून बाहेर आहेत. भारताने अतिगरिबी तर जवळजवळ संपवलीच आहे. आज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी भारताच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजनेला तंत्रज्ञानाचा चमत्कार सांगते असेही पंतप्रधान म्हणाले.

गुड का गोबर…

पंतप्रधान मोदी म्हणाले की, या अविश्वास प्रस्तावाच्या दरम्यान काही गोष्टी अशा घडल्या, ज्या कधी ऐकल्या नाहीत, पाहिल्या नाहीत आणि त्यांची कधीही कल्पनाही केली नाही. सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याचे नाव बोलणार्‍यांच्या यादीत नव्हतेच. 1999 मध्ये वाजपेयी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आला, त्यावेळी शरद पवार यांनी चर्चेचे नेतृत्व केले. 2003 मध्ये सोनिया गांधी यांनी नेतृत्व केले. 2018 मध्ये मल्लिकार्जुन खर्गे हे नेते होते. त्यांनी चर्चा पुढे नेली. मात्र यावेळी अधीरबाबूंना त्यांच्या पक्षाने बोलण्याची संधीच दिली नाही. बुधवारी अमितभाईने सांगितले की हे बरोबर वाटत नाही, त्यांना बोलू द्या. लेकिन गुड का गोबर कैसे करना है, उसमे ये माहीर है, असा टोला त्यांनी लगावला.

पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर या अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. सभागृहात विरोधक नसल्याने आवाजी मतदानाने अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेला.

विरोधकांना गुप्त वरदान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज मी सभागृहाला एक गुपित सांगणार आहे. माझा एका गोष्टीवर विश्वास बसलाय की, विरोधी पक्षाच्या लोकांकडे एक गुप्त वरदान आहे. हे लोक ज्याचे वाईट चिंततील, त्याचे चांगलेच होईल. यांनी 2018 मध्येही अविश्वास प्रस्ताव आणला होता. परंतु, त्यानंतर आम्ही अजून मोठ्या संख्येने परत आलो. उलट यांचीच मोजणी करायची वेळ आली.

तुमच्या दुकानाला जनता कुलूप लावणार

राहुल गांधी यांचे नाव न घेता मोदी यांनी त्यांच्यावर टीकेचा प्रहार केला. एका नेत्याला वारंवार लाँच करण्यात आले. पण प्रत्येकवेळी प्रयत्न फेल गेला. त्यांची बौद्धिक स्थिती आधी देशाला माहिती होती. आता तर त्यांच्या हृदयात काय आहे, हेही लोकांना कळून चुकले आहे, असे सांगत मोदी म्हणाले की, यांचे मोदी प्रेम इतके जबरदस्त आहे की, चोवीस तास व स्वप्नातही यांना मोदी दिसतात. मोदी पाणी प्यायले तर म्हणतात, बघा आम्ही मोदींना पाणी पाजले. मोदींनी जाहीर सभांमध्ये घाम पुसला तर म्हणतात, बघा आम्ही मोदींना घाम फोडला. तुमचे दुकान हे प्रेमाचे दुकान नाही तर ते तिरस्काराचे दुकान आहे. हे दुकान घोटाळे, परिवारवाद आणि तुष्टीकरणाचे दुकान आहे. मात्रा जनता या लोकांच्या दुकानाला कुलूप लावणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.