Latest

गर्भाशयापर्यंत पोहोचताहेत प्लास्टिकचे कण!

Arun Patil

वॉशिंग्टन : प्लास्टिकचे कण आता अगदी मातेच्या गर्भाशयापर्यंतही आढळून येत असून, यामुळे प्लास्टिक प्रदूषण आता अतिशय चिंताजनक स्तरापर्यंत पोहोचले असल्याची प्रचिती येत आहे, असे निरीक्षण टॉक्सिओलॉजिकल सायन्सेसमध्ये प्रकाशित अभ्यासातून नोंदवले गेले आहे. संशोधकांनी याबाबत 62 प्लेसेंटाचा अभ्यास केला. प्लेसेंटा हा गर्भाशयातील असा भाग असतो, जो भू्रणापर्यंत पोषक आहार पोहोचवतो. या सर्व 62 नमुन्यांमध्ये 7.5 ते 790 मायक्रोग्रॅमपर्यंतचे प्लास्टिक कण आढळून आल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिको हेल्थ सायन्सेसच्या संशोधकांनी यावर लक्ष वेधले. प्लेसेंटा आईच्या गर्भात केवळ आठ महिन्यांपुरतेच असते. पण, इतक्या कमी कालावधीत देखील प्लास्टिकचे कण तिथवर पोहोचत असतील तर प्लास्टिक प्रदूषण किती गंभीर स्वरूप धारण करत चालले आहे, याचे प्रत्यंतर येते, असे या संशोधकांनी यावेळी नमूद केले.

प्लेसेंटामध्ये पॉलिएथलिन नामक पॉलिमर सर्वाधिक प्रमाणात आढळून आल्याचे या संशोधकांनी स्पष्ट केले. या प्रकारचे प्लास्टिक हे प्लास्टिक बाटल्या व प्लास्टिक पिशव्या तयार करण्यासाठी अधिक वापरले जाते. संशोधन पथकाचे प्रमुख मॅथ्यू कॅम्पेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मायक्रोप्लास्टिकचा सर्वात कमीत कमी आकार इतका असू शकतो की, धमनीवाटे रक्ताच्या प्रवाहातून देखील ते सहज सामावून जाऊ शकतात.

SCROLL FOR NEXT