मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि भाजपचे उत्तर मुंबई मतदारसंघातील उमेदवार पियूष गोयल यांच्या संपत्तीत अवघ्या दोन वर्षात 11 कोटींची वाढ झाली असून लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांची सध्याची एकत्रित संपत्ती 110 कोटी 95 लाखांहून अधिक आहे.
गोयल यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबत त्यांनी संपत्तीबाबत शपथपत्र सादर केले आहे. त्यांची जंगम मालमत्ता 89 कोटी 86 लाख 56 हजार 447 रूपये असून 21 कोटी 8 लाख 58 हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांची एकूण संपत्ती 110 कोटी 95 लाख 14 हजार 447 रूपये आहे. 2022 साली त्यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. या अर्जात दिलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण मालमत्ता 99 कोेटी 83 लाख 96 हजार 983 रूपये इतकी होती. केवळ दोन वर्षात त्यांच्या संपत्तीत 11 कोटी11 लाख 17 हजार 464 कोटी इतकी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे गोयल यांच्या जंगम संपत्तीत अवघ्या दोन वर्षा्त जवळपास 10 कोटींची वाढ झाली आहे. त्यांच्या पत्नीवर 14 कोटी 22 लाख 65 हजार 61 रूपयांचे कर्ज आहे.
भाजपचे उमेदवार पियूष गोयल व त्यांच्या पत्नी या दोघांकडे सोने-हिरे, चांदी व तीन सोन्याची घड्याळे आहेत. आजच्या बाजारभावाप्रमाणे त्यांचे मूल्य 7 कोटी 20 लाख 11 हजार 586 रूपये आहे. त्यांच्याकडे टोयोटा कंपनीच्या तीन गाड्या आहेत. तसेच त्यांच्या मालकीच्या एकूण चार सदनिका आहेत. यापैकी दोन फ्लॅट मुंबईतील सायन येथे, एक दिल्ली व एक पुणे येथे आहे.
मुंबई : पुढारी वृत्तसेवा :
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आणि पक्षाच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही. त्यांचे पती राजू गोडसे यांचीही हीच अवस्था आहे. विशेष म्हणजे मागील साडेचार वर्षात गायकवाडांच्या संपत्तीत साठ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, विना परवाना सभा, मोर्चा आणि आंदोलनांपायी त्यांच्याविरोधात सात गुन्ह्यांची नोंद आहे.
वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी उत्तर मध्य मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार गायकवाड पती-पत्नींकडे स्वतःचे कोणतेच वाहन नाही. मात्र, दोघांकडे मिळून 3 कोटी 96 लाख 90 हजार 569 रूपयांची जंगम मालमत्ता आहे. तर, 7 कोटी 68 लाख 48 हजार 565 रूपयांची स्थावर मालमत्ता आहे.
त्यांची एकूण संपत्ती 11 कोटी 65 लाख 39 हजार 225 रूपये इतकी आहे. साडेचार वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत त्यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे 4 कोटी 81 लाख 53 हजार 269 रुपयांची संपत्ती होती. त्यामुळे गायकवाड यांच्या संपत्ती जवळपास दुप्पट झाली आहे. तर, मागच्या विधानसभा निवडुकीवेळी गायकवाड दांपत्यावर कोणतेच कर्ज नव्हते. आता मात्र त्यांच्यावर 1 कोटी 1 लाख 60 हजारांचे कर्ज आहे. विशेष म्हणजे वर्षा गायकवाड यांच्यावरील 80 लाखांचे कर्ज हे त्यांच्या पतीकडून घेतलेल्या रकमेचेच आहे. वर्षा गायकवाड यांच्या शपथपत्रानुसार आझाद मैदान पोलिस ठाणे, चुनाभट्टी आणि वांद्रे पोलिस ठाण्यात या गुन्ह्यांची नोंद आहे.
मुंबईः पुढारी वृत्तसेवा
शिवसेना(ठाकरे) गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी मंगळवारी मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांची एकूण संपत्ती चार कोटींहून अधिक आहे.
पाटील यांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांची व त्यांच्या कुटुंबाची एकूण जंगम मालमत्ता 3 कोटी 81 लाख 11 हजार 143 रूपयांची आहे. तसेच त्यांची स्थापर मालमत्ता 36 लाख 51 हजार 500 रूपये इतकी आहे. त्यांची एकूण संपत्ती 4 कोटी 17 लाख 62 हजार 643 रूपये आहे. विशेष म्हणजे त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले शपथपत्र हे मराठी भाषेत आहे.