Latest

Psi Somnath Zende : करोडपती फौजदार अडकला वादाच्या भोवर्‍यात; कुठे कौतुक, तर कुठे टीका

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील एक पोलिस उपनिरीक्षक ड्रीम इलेव्हन या ऑनलाईन गेम खेळून चक्क करोडपती झाला आहे. या गेममध्ये संबंधित पोलिस अधिकार्‍याला तब्बल दीड कोटीचे बक्षीस लागले आहे. सोमनाथ झेंडे असे या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. दरम्यान, झेंडे हे पोलिस अधिकारी असून कर्तव्यावर असताना जुगारसदृश्य गेम कसे खेळू शकतात, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी काहीजण करत आहेत. तर, काही त्यांचे कौतुक करीत त्यांच्या आनंदात सहभागी होत आहेत.

ऑनलाइन गेमच्या माध्यमातून करोडपती झालेले सोमनाथ झेंडे हे सध्या आरसीपी (दंगा काबू पथक) पथकात कार्यरत होते. मंगळवारी ( दि. 10) उर्से टोल नका येथे बंदोबस्तात असताना त्यांना ड्रीम 11 या ऑनलाईन गेममध्ये तब्बल दीड कोटीचे बक्षीस लागल्याचे समजले. ही बातमी वेगाने सर्वत्र पसरली. अनेक पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले. मात्र, कर्तव्यावर असताना पोलिस अधिकारी कसा काय ऑनलाईन गेम खेळू शकतो, ड्रीम्स 11 हा एका प्रकारचा जुगार आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी काही करत काहींनी झेंडे यांच्यावर टीका केली आहे. तर, काहींनी नशीबवान आहे हा अधिकारी, अशी प्रतिक्रिया देत त्यांच्या आनंदात सहभागी झाले आहेत.

तीन वर्षांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा…

पोलिस उपनिरीक्षक झेंडे हे पूर्वी चाकण पोलिस ठाणे नेमणुकीस होते. दरम्यान, डिसेंबर 2021 मध्ये त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एक गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी झेंडे यांनी एकाकडे 85 हजार रुपयांची मागणी केली होती. त्या वेळी लाचलुचपत विभागाने झेंडे यांच्यासाठी एका खासगी इसमाला पैसे घेताना रंगेहात पकडले. याची दखल घेत उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी झेंडे यांना तडकफडकी निलंबित केले होते.

भाजपकडून कारवाईची मागणी…

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत नियुक्तीस असलेले पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे ऑनड्यूटी असताना ऑनलाइन जुगार खेळतात. त्यातून त्यांना काही रक्कम मिळाली. त्याचा गाजावाजा करून त्यांनी ऑनलाइन जुगाराला चालना देण्याचे काम केले आहे. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी विनंती भाजपचे प्रवक्ते अमोल थोरात यांनी केली आहे.

काय होऊ शकते कारवाई…

सोमनाथ झेंडे हे कर्तव्यावर असताना ऑनलाईन गेम खेळत होते. त्यामुळे त्यांच्यावर कर्तव्यावर असताना मोबाईलचा वापर, कामात हलगर्जीपणा या कारणासाठी कारवाई होऊ शकते. ड्रीम 11 वर गेम खेळणे हा गुन्हा आहे, असे कुठेही नमूद नाही. त्यामुळे कर्तव्यावर असताना मोबाईलचा वापर, गेम खेळणे, या कारणासाठी जी कारवाई होते तीच कारवाई झेंडे यांच्यावर होणे अपेक्षित आहे, असे काही कायदेतज्ज्ञांनी सांगितले.

पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे करणार चौकशी

पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे या करणार असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी सतीश माने यांनी दिली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT