Latest

घाबरू नका..! पण सतर्क रहा, मुलांना चोरणारी टोळी पकडल्याचा व्हायरल व्हिडीओ पुण्याचा नाही

अमृता चौगुले

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी – चिंचवड नजीकच्या खेड तालुक्यात मुलांना चोरणारी टोळी पकडली असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; मात्र तो व्हिडीओ पुणे जिल्ह्यातील नसून रायगड येथील खेडचा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे; तसेच पालकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील काही दिवसांपासून लहान मुलांना पळवून नेणार्‍या टोळीबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. दरम्यान, एका व्हिडीओमध्ये लहान मुलांबाबत धक्कादायक कृत्य केल्याचेदेखील दिसत आहे.

टोळी पकडल्याचा व्हिडीओ रायगड जिल्ह्यातील खेड येथील आहे; मात्र पिंपरी-चिंचवड शहर परिसरात हा व्हिडीओ व्हायरल होत असताना पुणे जिल्ह्यातील खेड येथील असल्याचे सांगितले जाते. ज्यामुळे शहरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत पिंपरी – चिंचवड पोलिसांनी हा व्हिडीओ पुणे ग्रामीण हद्दीतील नसल्याची खात्री केली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओच्या अनुषंगाने चौकशी केली आहे. व्हिडीओमधील व्यक्ती सांगत असलेले ठिकाण पुणे जिल्ह्यातील नसून रायगड जिल्ह्यात आहे. सध्या मुलांना पळवणारी कोणतीही टोळी पकडलेली नाही. मात्र, तरीदेखील नागरिकांनी मुलांच्या बाबतीत सतर्क राहणे अपेक्षित आहे.
– पद्माकर घनवट, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT