Latest

दुचाकीतील पेट्रोल चोरुन नशा करणारी महिला दामिनी पथकाच्या ताब्यात

backup backup

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : नशेची सवय काय करायला लावेल काही सांगता येत नाही. बीड बायपास परिसरात एका महिलेला पेट्रोलची नशा करण्याची सवय लागली. या सवयीमुळे परिसरातील नागरीकांच्या दुचाकीतील पेट्रोल चोरीचे प्रकार तिने सुरू केले. नागरीकांना हा प्रकार कळताच त्यांनी दामिनी पथकाला या गोष्टीची माहिती दिली. बीड बायपास भागातील एशियाड कॉलनी भागात हा प्रकार घडला. दामिनी पथकाने या महिलेला ताब्यात घेऊन फैयामी ईन्सानियत फाऊंडेशनच्या मदतीने मानसोपचार तज्ञाकडे उपचारासाठी दाखल केले.

बीड बायपास भागातील एशियाड कॉलनी भागातील दुचाकीस्वारांच्या दुचाकीमधून पेट्रोल चोरीस जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले होते. वाहनधारकांनी तसेच परिसरातील नागरीकांनी या चोराला पकडण्यासाठी पाळत ठेवली. यावेळी हा प्रकार एक महिला करीत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी दामिनी पथकाला या महिलेबाबत माहिती दिली. दामिनी पथकाने या महिलेचे घर गाठून तिला ताब्यात घेतले. यावेळी देखील ही महिला नशेमध्येच होती. या महिलेला मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात सुरूवातीला देण्यात आले. या महिलेचा पती तसेच तिच्या आईने देखील महिला गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोलची नशा करीत असल्याची माहिती पोलिसांना दिली. हा गंभीर प्रकार पाहून दामिनी पथकाने या महिलेला नशामुक्तीसाठी मदत करण्याचे ठरवले.

फैयामी ईन्सानियत फाऊंडेशनचे जुनेद मौलाना यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मौलाना यांनी पडेगाव येथील डॉ. कादरी यांच्याशी संपर्क साधत या महिलेवर उपचार करण्याची विनंती केली. डॉ. कादरी यांच्या मानसोपचार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी या महिलेला दाखल करण्यात आले. ही कामगिरी सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे, पीएसआय कांचन परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाच्या जमादार निर्मला अंभोरे, कल्पना खरात, अमृता भोपळे, अनिता खैरे आणि अंबिका दारुंटे यांनी केली.

SCROLL FOR NEXT