गुरुग्राम : पावभाजी आपण सर्वांनी खूप वेळा खाल्ली असेल. पण, गुरुग्राममधील सेक्टर 15 जवळ असलेल्या एका ठेल्यातील पावभाजी आणखी खास आहे आणि त्याहूनही खास आहे हा ठेला चालवणारा अवलिया! कुशेश्वर भगत असे या अवलियाचे नाव असून ते ज्या आवडीने पावभाजी बनवतात, त्याही पेक्षा अधिक आवडीने त्यांना निवडणुका लढवण्याचाही छंद आहे!
स्वादिष्ट पावभाजीसह गुरुग्रामच्या लोकांना वेड लावणारे कुशेश्वर भगत सेक्टर 15 जवळ आपला ठेला लावतात. त्यांची पावभाजी तर प्रसिद्ध आहेच. पण, ते स्वत:ही बरेच लोकप्रिय आहेत. त्यांनी एकदा-दोनदा नव्हे तर चक्क 5 वेळा निवडणुका लढवल्या आहेत. त्यांनी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. शिवाय, अगदी राष्ट्रपती निवडणुकीच्या रिंगणातही उडी घेतली. आता त्यांना या प्रत्येक वेळी पराभव पत्करावा लागला. पण, तरी त्यांनी जिद्द सोडलेली नाही.
कुशेश्वर भगत मूळचे बिहारचे. ते तेथून मुंबईला गेले आणि तेथे पावभाजी बनवणे शिकून घेतले. त्यानंतर ते मुंबईतून गुरुग्रामला आले आणि तेथेच पावभाजी करू लागले. आता उदरनिर्वाहासाठी त्यांनी हे काम शिकून घेतले. पण, स्वादिष्ट पावभाजीची चर्चा दूरवर पोहोचली आणि दूर-दूरवरून लोक त्यांची पावभाजी खायला येत असतात. आतापर्यंत निवडणुकीचा फड जिंकता आला नसला तरी पावभाजीचा फड मात्र त्यांनी निश्चितपणाने जिंकलेला आहे.