Latest

सातारा : दणदणाट केला राजकारण्यांनी… बदनाम झाले पोलिस

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेकर्णकर्कश ध्वनियंत्रणा यंदा दणाणली. राज्य सरकारचे लेचेपेचे धोरण आणि स्थानिक पातळीवर ध्वनी यंत्रणावाल्यांनी राजकारण्यांना भेटून घेतलेली सवलत. यामुळे गेल्या सहा महिन्यांत बहुतेक उत्सवात ही यंत्रणा थाटात वाजली. ती एवढी वाजली की सातार्‍यात तर बंदूक, तलवारीच्या तालावर कोणाची यंत्रणा जोरात वाजते याची स्पर्धा भरली आणि पोलिस बदनाम झाले.

कर्णकर्कश ध्वनियंत्रणे विरोधात आवाज उठवला असतानाच शहरालगत महामार्गावर आक्रीतच घडले. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपवर युवकांच्या ग्रुपमध्ये ध्वनियंत्रणा कोणाची जोरात वाजते याची पैज लागली आणि थेट दोन यंत्रणा, अडीचशे युवक सोबत बंदूका, तलवारी, कोयते आले आणि फुल्ल आवाजात दणदणाट झाला. कायदा व सुव्यवस्थेलाच या युवकांनी जणू आव्हान दिले.

भिंत पडून बोले मामा चिरडले होते…

कर्णकर्कश ध्वनियंत्रणैमुळे सातार्‍यात आतोनात नुकसान झाले आहे. यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यात अनेक नागरिकांचे बळी गेले आहेत. सातार्‍यातील बोले मामा हे त्यातीलच एक उदाहरण. एकीकडे सिस्टीम दणाणत होती आणि दुसरीकडे तिच्या आवाजाने भिंत पडून बोले मामा चिरडले गेले. एवढा गंभीर प्रकार घडल्यानंतरच सातार्‍यातून कर्णकर्कश ध्वनियंत्रणा बळं-बळं हद्दपार झाली. पुढे कायद्याच्या कचाट्यातून ती सेफ राहिली. कायदा सक्षम आहे. यंत्रणा वाजत असताना त्यासाठी त्याचे डेसिबलवर मोजमाप केले जाते. त्यानंतर त्याचा प्रस्ताव तयार करून डीवायएसपी ऑफीसला पाठवला जातो. ते अधिकारी थेट न्यायालयात पुरावे सादर करतात. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होते. कायदा राबवताना त्यासाठी प्रक्रिया आहे. यासाठी केवळ कायदा राबवणारे अधिकारी सक्षम व इच्छाशक्ती असणारे हवेत. दुर्देवाने सातार्‍यात नाहीत.

सामान्य नागरिक आलेत मेटाकुटीला….

  •  यावर्षी गेल्या सहा महिन्यांत बहुतेक उत्सवांमध्ये कर्णकर्कश ध्वनियंत्रणा हळूहळू वाजत होती. 'राज्य सरकारकडूनच उत्सव जल्लोषात साजरे करणार' असे जाहीर झाल्याने यंत्रणावाल्यांना आयतेच कोलीत मिळाले. असे असले तरी सातार्‍यात ती वाजणार नाही, ही सुरू झालेली परंपरा मोडीत काढण्यासाठी बोली चालवली गेली. स्थानिक पातळींवर यंत्रणा चालकांना त्रास देऊ नका, अशी तंबी पोलिसांना देण्यात आली. यामुळे सिस्टीम थाटात बाहेर आली आणि सातार्‍यात ती बेक्कार वाजली.
  •  उत्सव नसतानाही अधूनमधून दणदणाट होवू लागला. रात्री-अपरात्री बिनधोकपणे सिस्टीम वाजू लागली. यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आला. याप्रकरणी दैनिक 'पुढारी'ने गेल्या आठवड्यात आवाज उठवला होता. या वृत्तानंतर सातारा शहर पोलिसांनी किमान झाडाझडती घेतली.

लेच्यापेच्या धोरणांमुळे गल्ली-बोळ कर्णकर्कश आवाज टिपेला…

यंत्रणा कोणाची जोरात वाजते ही स्पर्धा घेण्यामागे गेल्या सहा महिन्यांपासूनचा कालावधी कारणीभूत आहे. सातार्‍यात गल्लीबोळातही सहज वाजत आहे. बहुतेक उत्सवांमध्येही कर्णकर्कश ध्वनी यंत्रणा दणाणली. यामुळे आपणही सिस्टिम कोणाची जोरात वाजते? याची पैज लावू ही शक्कल समोर आली. यामुळे पोलिसांनी राजकारण्यांचे किती ऐकावे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. एखादी चांगली गोष्ट करायची म्हटले की त्याला वेळ जातो. मात्र चुकीची गोष्ट करायची म्हटले की वेळ लागत नाही. यामुळे आतातरी पोलिसांनी या विरोधात कठोर पावले उचलून आवाज दाबावा, अशी मागणी सातारकरांतून होत आहे.

SCROLL FOR NEXT