Latest

निर्बंधमुक्त उत्सवामुळे नागरिकांमध्ये उत्साह : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: मी पुण्यामध्ये बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या चेहऱ्यावर उत्सवाचा आनंद, उत्साह पहायला मिळत आहे. यंदा सर्वांना मोकळा श्वास घेत, जल्लोषात गणेशोत्सव साजरा करता येत आहे. दोन वर्षे राज्यातील जनता कोरोनामुळे त्रस्त झाली होती. सर्वत्र नकारात्मकता पसरली होती. त्यामुळे यंदा दहीहंडी उत्सवापासूनच सरकारने सर्व निर्बंध उठवले. नियम पाळून आणि काळजी घेऊनही उत्सव साजरे करता येतात, हे लोकांनी दाखवून दिले, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दुपारी अडीच वाजता पुण्यातील मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्प, हार अर्पण केला. रोहित टिळक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. गणपती दर्शनानंतर शिंदे यांनी आमदार मुक्ता टिळक यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुक्ता टिळक यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि पुढील अधिवेशनाला नक्की उपस्थित रहा, असे आवर्जून सांगितले. टिळक वाड्याला भेट देऊन ते पुढील भेटीसाठी रवाना झाले. टिळक वाड्यातून बाहेर पडताना त्यांनी गाडीतून हात उंचावून नागरिकांना अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

एकनाथ शिंदे म्हणाले, 'मुक्ता ताईंवर सध्या उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीतही त्या नागरिकांच्या भल्याचा विचार करत आहेत. त्यांची तळमळ पुण्यातील लोकांसाठी आहे. ४०-५० वर्षांपूर्वीच्या इमारती, बांधकामे यांचा पुनर्विकास एफएसआयच्या मुद्दयामुळे अडकला आहे. यातून काही मार्ग निघावा अशी इच्छा व्यक्त केली असून त्यासंदर्भातील पत्र त्यांनी मला दिले आहे. याबाबत नक्कीच सकारात्मक निर्णय घेतला जाईल. मी लगेच अधिकाऱ्यांना तशा सूचनाही दिल्या आहेत.' केसरीवाड्याला वैभवशाली इतिहास आहे. टिळक कुटुंबियांनी या वास्तूची जपणूकही केली आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो, असेही त्यांनी नमूद केले.
टिळक वाड्यातून बाहेर पडताना एकनाथ शिंदे यांनी गाडीच्या फूट स्टेअरवर उभे राहून नागरिकांना अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष केला आणि 'गणपती बाप्पा मोरया'चा गजरही केला.

SCROLL FOR NEXT