Latest

पुण्यात पाणी कपातीबाबत नागरिक संतप्त

अमृता चौगुले

पुणे : धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पुणेकरांना पाणीकपातीला तोंड द्यावे लागत असल्याने अनेक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. गेल्या पाच वर्षांत पाणीपट्टीमध्ये भरमसाट वाढ सहन करून तसेच शेतीसाठी मुंढवा येथून दरमहा अर्धा टीएमसी पाणी दिल्यानंतरही पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत असल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर म्हणाले की, पुढील अडीच महिने दर गुरुवारी पाणीकपात करून दहा दिवसांचे म्हणजे फक्त अर्धा टीएमसी पाणी वाचेल. गेल्या वर्षापेक्षा जवळपास पाऊण टीएमसीने धरणात पाणीसाठा जास्त असताना ही कपात किती अनावश्यक व अनाठायी आहे, हे सहज लक्षात येऊ शकते. सिंचनाचे आवर्तन अर्धा टीएमसीने कमी करण्याचा निर्णय घेतला असता, तर ही गरजच पडली नसती. सांडपाण्यावर प्रक्रिया करून दरमहा अर्धा टीएमसी एवढे पाणी सिंचनासाठी सोडल्यानंतर त्याचा हिशेब कुणी करीत नाही, हे पुणेकरांचे दुर्दैव आहे. पाणीकपातीचा सगळ्यात जास्त फायदा टँकर लॉबीला होतो. कपातीच्या दुसर्‍या व तिसर्‍या दिवशी टँकरवर अवलंबून असणार्‍या पुणेकरांची संख्या भरमसाट वाढते. गेली सहा वर्षे दरवर्षी पंधरा टक्के पाणीपट्टीत वाढीचा भुर्दंड सोसावा लागणार्‍या पुणेकरांना लाखो रुपये टँकरवर खर्च करावे लागतात.

पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय चुकीचा

गेली अनेक वर्षे पुणे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचा गैरकारभार मी अनुभवतो आहे. दै. 'पुढारी'ने त्यावर प्रकाश टाकला त्याबद्दल धन्यवाद! धरणांमध्ये ऑगस्टअखेरपर्यंत मुबलक पाणी असताना आगामी काळातील पर्जन्यमान नेहमीसारखे राहणार नाही, असे तर्कट लावून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंदचा निर्णय हा तुघलकी विचारधारेचा आहे.
-अ‍ॅड. शिरिष शिंदे

पुरेसे पाणी असूनही पाणीकपात

शहरास पाणी पुरविणार्‍या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असला, तरी पुणेकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदा उन्हाळा कमी आहे. अवकाळी पावसामुळे यंदा पाऊस कमी पडला, तर खबरदारी म्हणून पाणीकपातीचा निर्णय घेतला गेला. हा निर्णय पुणेकरांवर अन्याय करणारा असून, सामाजिक भावनेतून दोन वर्षांपूर्वी मनपा आयुक्त, विभागीय आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्या वेळी पाण्याचे संकट असले, तरी पाणीकपात लादली गेली नव्हती. पालिकेने असे करणे म्हणजे निर्णय लादण्यासारखे आहे.
– नरेंद्र मते

हुकूमशाही पद्धतीने निर्णय

पालिका प्रशासनाने घेतलेला एकतर्फी निर्णय पुणेकरांवर तुघलकी फर्मान असल्याचा दिसतो. यापूर्वी अनेकदा असा प्रसंग पुणेकरांवर आलेला असला, तरी पालिकेने असे निर्णय घेतले नव्हते. या वेळी प्रशासकराज असल्यानेच हुकूमशाही पद्धतीने निर्णय लादले जात आहेत. तरी या निर्णयाविरुद्ध आवाज उठवावा लागेलच.
– संदीप जोशी, लक्ष्मीनगर

वाचकांनी प्रतिक्रिया व अनुभव कळवावेत

पाणीकपातीच्या काळात अनेक भागांत सलग दुसर्‍या दिवशी, काही ठिकाणी तिसर्‍या दिवशी नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा झाला. अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. त्याचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागला. अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याची पातळी कमी झाल्याने विद्युत मोटारी जळाल्याची तक्रार आहे. यासंदर्भात वाचकांनी त्यांच्या प्रतिक्रिया, सूचना तसेच त्यांचे म्हणणे दै. मपुढारीफला कळवावे. यासंदर्भात 9823158113 या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचे म्हणणे कळवू शकता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT