Latest

PDCC Bank : राष्ट्रवादी सोडून गेलेल्या कलाटे यांचा करेक्ट कार्यक्रम, पुणे जिल्हा बँकेत मुळशीतून सुनील चांदेरे विजयी

backup backup

पिरंगुट ; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत मुळशी तालुक्यात ४५ पैकी २६ मते घेत राष्ट्रवादीचे सुनील चांदेरे यांनी आत्माराम कलाटे यांचा पराभव केला. चांदेरेंच्या विजयामुळे मुळशी सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता हा सहकार क्षेत्रामध्ये मोठ्या जागेवर विराजमान झाला आहे. प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणूकीत चांदेरे यांना विजयी करून कलाटे यांचा 'करेक्ट' कार्यक्रम करायचा, असे सूतोवाच खासदार सुप्रिया सुळे यांनी अगोदरच दिला होता. (PDCC Bank)

तालुक्यात ४६ विकास सोसायट्या आहेत. जिल्हा बँकेच्या संचालक पदावर आत्माराम कलाटे हे गेली बावीस वर्षांपासून होते. एक वर्ष बँकेचे उपाध्यक्षपदही त्यानी उपभोगले. राष्ट्रवादीच्या माध्यमातून कलाटे यांना बॅंकेवर काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी गेली दोन वेळा राजाभाऊ हगवणे यांचा पराभव केला होता.

PDCC Bank : राष्ट्रवादीतून सोडून गेल्याने करेक्ट कार्यक्रम

अडीच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीपूर्वी कलाटे यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिवसेनेचे शिवधनुष्य हाती घेतले होते. भोर विधानसभेतून सेनेकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती; परंतू याठिकाणी सेनेने त्यांना डावलले. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली हाेती.

सुनील चांदेरे हे राष्ट्रवादीचे विद्यार्थीदशेपासून शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या विचारांना माननारे कार्यकर्ते आहेत. उत्तम वक्तृत्वशैलीमुळे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष असताना पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्यास त्यांची कामगिरी मोलाची ठरली हाेती.  आतापर्यंत त्यांच्याकडे लोकनियुक्त पद नव्हते. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीसाठी वरिष्ठांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर गेली दोन वर्षांपासून विकास सोसायटीच्या प्रतिनिधी निवडीपासून प्रयत्नशील होते. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे यांनीही अजित पवार, सुप्रिया सुळे यांना चांदेरे यांच्या विजयाबद्दल आत्मविश्वास दाखवला होता.

कोरोना आणि न्यायालयाच्या निर्णयामुळे या निवडणूका लांबत गेल्या. आत्माराम कलाटे यांनीही आपल्या बाजूचा प्रतिनिधी यावा यासाठी डावपेच आखले. निवडणूकीच्या शेवटच्या क्षणी तीन सोसायट्यांचे प्रतिनिधीही बदलले गेले. जामगावला वेळीच प्रतिनीधी न मिळाल्याने ही सोसायटी निवडणूकीपासून वंचित राहिली.

अजित पवार यांचा सुनील चांदेरे यांना पाठींबा तर दुसरीकडे तब्बल बावीस वर्षाचा आत्माराम कलाटे यांचा दीर्घ अनुभव यामुळे राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणूकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कोंढरे आणि त्यांची टीम एकएक मत गोळा करण्यासाठी रात्रंदिवस पळत होती. त्याचदरम्यान राष्ट्रवादीतीलच काही मंडळी पडद्याआडून कलाटे यांच्यासाठी सूत्रे हालवत होती.

गुन्हेगारीची दहशतही दाखविली गेली

या निवडणूकीत मतदाराला आपल्याकडे वळविण्यासाठी साम दाम दंड भेद या नितीचाही वापर केला गेला. गुन्हेगारीची दहशतही दाखविली गेली. मतदारांच्या खिशात नोटांचा पाऊस पडला. त्यांची दररोज या निवडणूकीच्या चर्चेचा रंग बदलत होता. ४६ पैकी २६ मते घेवून चांदेरे यांनी विजयाचा शिक्कामोर्तब केला. कलाटे यांची सहकारातील बावीस वर्षांची परंपरा मोडीत काढली. चांदेरे यांचा हा विजय म्हणजे तालुक्याच्या पुढील होणाऱ्या सहकाराच्या निवडणूकीतील परिवर्तनाची नांदी असल्याची चर्चा आहे.

महादेव कोंढरे (अध्यक्ष, मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस) – या विजयात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱी कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा असून हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी असलेल्या राष्ट्रवादी काँगेस पक्षाचा विजय आहे.

सुनील चांदेरे

SCROLL FOR NEXT