Latest

Mumbai Hoarding Collapse : मुंबईला वादळी वा-याचा तडाखा, होर्डिंगसह पार्किंग लिफ्ट कोसळून मोठा अपघात

करण शिंदे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबईला सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. यामुळे दक्षिण मुंबईपासून दक्षिण मध्य मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात तसेच घाटकोपर, वडाळा आणि कांजुरमार्गमध्ये अनेक ठिकाणी पडझडींमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. दुपारपासूनच ढग दाटून आले होते. ज्यामुळे सर्वत्र काळोख पसरला होता. पावसात ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला.

मुंबईतील मेट्रो, लोकल आणि विमान सेवेवर देखील याचा परिणाम झाला. संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे या पावसामुळे हाल झाले आहेत. हवामान खात्याने मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील 3 तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

नवी मुंबई, ठाण्यातून हवामान बदलाला सुरुवात झाली. दाटून आलेल्या ढगांनी दक्षिण मुंबईकडे आगेकुच करण्यास सुरुवात केली. वादळी वा-याने मुंबईकडे मोर्चा वळविला असतानाच संपुर्ण मुंबई काळोखात बुडाली. वादळी वारे मुंबईवर घोंगावित असतानाच धूळ वातावरणात मिसळी आणि मुंबईवर धूळीचे वादळ तयार झाले. मुलुंड, भांडूप, कांजुरमार्ग, नाहुर, कुर्ला, घाटकोपर, पवई, सायन, दादर असा रोख करत वादळी वारे दक्षिण मुंबईत दाखल झाले. तोवर मुंबईच्या उपनगरात पावसाने विशेषत: वादळी वा-याने थैमान घातले होते.

दादरच्या शिवाजी पार्कची धूळ वातावरणात मिसळत असतानाच लालबाग, परळ, वरळीपासून महालक्ष्मी, भायखळा आणि फोर्टपर्यंत सर्वत्र वादळी पावसाने थैमान घातले. वादळी वा-याची तीव्रता वाढत असल्याने गगनचुंबी इमारतीही दिसेनाशा झाल्या होत्या. कधी नव्हे ते वादळ वा-याचे रौद्र रुप पाहिल्याने मुंबईकरांना धडकी भरली होती. झोपड्या, चाळी, इमारतीमधील रहिवासी घाबरून रस्त्यांवर उतरले होते. निसर्गाचे रौद्र रुप पाहून मुंबईकरांना धडकी भरली.

अनेक ठिकाणी काही अनपेक्षित घटना घडल्या आहेत. मुंबईत दोन ठिकाणी भलेमोठे होर्डिंग कोसळल्याच्या घटना घडल्या. घाटकोपरमध्ये तर थेट पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं आहे. या होर्डिंग कोसळल्याचे दृश्य अंगावर काटा आणणारे आहेत. होर्डिंग कोसळल्याच्या दोन घटना ताज्या असतानाच मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल कोलमडली आहे. वादळी वाऱ्यामुळे मध्य रेल्वे मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी बचाव कार्यात मदत केली. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये बांधकाम सुरू असलेला लोखंडी पार्किंग टॉवर रस्त्यावर कोसळताना दिसत आहे.

दादर, कुर्ला, माहीम, घाटकोपर, मुलुंड आणि विक्रोळी या उपनगरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, तर दक्षिण मुंबईतील काही भागात रिमझिम पाऊस झाला. ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण आणि उल्हासनगर या भागांमध्येही सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस झाला.

यासोबतच, घाटकोपरमध्ये पंत नगरजवळील पेट्रोल पंपाच्या छतावर होर्डिंग पडल्याने सात जण जखमी झाले. दरम्यान बचावकार्य करताना मुंबई अग्निशमन दलाने सांगितले की, बचाव प्रक्रिया अजूनही सुरू आहे. अनेक लोक या ठिकाणी अडकल्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या बचाव कार्यात 47 लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींना घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बरोबरच घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्यामुळे उत्तरेकडील कामराज नगर येथे वाहतूक मंदावली होती, असे मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT