Latest

Gujarat | विवाहित महिलेच्या प्रियकरानं तिच्या घरी बॉम्बचं पार्सल पाठवलं; स्फोटात नवरा, मुलीचा मृत्यू

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील वडाली येथे गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक व्यक्ती आणि त्याच्या मुलीचा समावेश होता. तर दोनजण गंभीर जखमी झाले. दरम्यान, स्फोटक वस्तूचे पार्सल मृत व्यक्तीच्या पत्नीशी कथित संबंध असलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या घरी पाठवले होते, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, संबंधित कुटुंबाने पार्सल उघडले आणि त्याचा स्फोट झाला. यात ३२ वर्षीय जीतूभाई हीराभाई वंजारा हा मजूर जागीच ठार झाला. तर त्याची १२ वर्षांची मुलगी भूमिका गंभीर जखमी झाली. पण रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. ही घटना ज्यावेळी घडली तेव्हा जीतूभाईची पत्नी घरात नव्हती.

जयंतीभाई बालूसिंह वंजारा याने ऑटो रिक्षातून एक पार्सल जीतूभाईच्या घरी पाठवले. टेपरेकॉर्डरसारखे दिसणारे हे पार्सल जेव्हा जीतूभाईंनी उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा स्फोट झाला. यात त्यांचा आणि त्यांच्या १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली.

जयंतीभाई हे बॉम्ब बनवण्यासाठीचे साहित्य मिळवण्यासाठी राजस्थानला गेले होते. त्यांनी स्फोटासाठी जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटरचा वापर केला होता. त्यांनी "टेप रेकॉर्डर" प्लग इन करताच बंद केला होता, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी विजय पटेल यांनी सांगितले.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घरापर्यंत ज्या ऑटो-रिक्षा चालकाने पार्सल पोहोचवले त्याची ओळख पटली आहे. दरम्यान, पोलिसांनी रिक्षाचालकाच्या जबाबाच्या आधारे आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार केली. या स्फोटाच्या घटनेनंतर काही तासांतच जयंतीभाईंला अटक करण्यात आली.

सदर आरोपीने जीतूभाईच्या घरी पार्सल पाठवले होते. कारण जीतूभाईंची पत्नी त्याची आधीची प्रेयेसी होती. तिने जीतूभाईसोबत लग्न केल्याबद्दल तो नाराज झाला होता. यामुळे त्याने जीतूभाईच्या घरी पार्सलमधून बॉम्ब पाठवला, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.

या स्फोटात जीतूभाईच्या इतर ९ आणि १० वर्षांच्या दोन मुलींच्या डोळ्यांना आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एक व्हेंटिलेटरवर आहे. दोन्ही बहिणींना पुढील उपचारासाठी अहमदाबादला नेण्यात आले आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT