Latest

Paralysis : पस्तीशीत गाठतोय पक्षाघात; वेळीच सावध होणे गरजेचे

Arun Patil

कोल्हापूर, पूनम देशमुख : बदलती जीवनशैली आणि वाढत्या ताणतणावामुळे साठीतला पक्षाघात (पॅरालिसिस) आजार आता पस्तीशीत देखील डोके वर काढू लागला आहे. कोरोनापश्चात व्यक्तींमध्ये या आजाराचा धोका वाढला आहे. जगात दर 2 सेकंदाला एक तर देशात दर मिनिटाला 6 लोकांना पक्षाघात होत असून, दरवर्षी 20 लाखांहून अधिक जणांचा यामुळे मृत्यू होतो. सध्या पक्षाघाताचे 20 टक्के रुग्ण हे 35 ते 40 वयोगटातील आहेत. पक्षाघाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेतल्यास 60 टक्के रुग्णांचा जीव वाचू शकतो.

मेंदूत ऑक्सिजन आणि पोषकद्रव्ये वाहून नेणारी रक्तवाहिनी गुठळ्यांद्वारे अवरोधित होते किंवा फुटते त्यावेळी पक्षाघात होतो. 80 टक्के रुग्णांत रक्तवाहिनी बंद होते तर 20 टक्के रुग्णांमध्ये रक्तवाहिनी फुटते. पक्षाघाताचे गांभीर्य कमी असणारा रुग्ण 12 आठवड्यांत बरा होतो, एका पाहणीनुसार 30 टक्के स्ट्रोक कमी गंभीर तर 60 टक्के गंभीर स्वरूपाचे असतात. पक्षाघाताची लक्षणे दिसताच पुढील 3 तासांत मेंदू तज्ज्ञांशी संपर्क साधल्यास रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता द़ृढावते.

पक्षाघाताचे दोन प्रकार

रोहिण्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्याने इस्केमिक स्ट्रोक येतो. पक्षाघाताच्या एकूण प्रकरणांपैकी 70 ते 80 टक्के प्रकरणे इस्केमिक स्ट्रोकची असतात.

रक्तवाहिन्या फुटल्यावर रक्त वाहून जाते आणि त्यामुळे हेमोराजिक स्ट्रोक येतो. रक्तवाहिन्या फुटल्याने किंवा रक्तवाहिन्यांचा कमकुवत भाग फुगल्याने अथवा बाहेर आल्याने पक्षाघात होतो.

पक्षाघाताची लक्षणे

चेहरा, हात, पाय किंवा विशेषतः शरीराची एक बाजू कमकुवत होते.
गोंधळाची स्थिती, बोलताना जडत्व येणे, गिळण्यास त्रास होणे.
समोरचे काही न दिसणे, धुरकट दिसणे, एका किंवा दोन्ही डोळ्यांना अंशतः अंधत्व येणे.
चालताना अडखळणे, तोल जाणे किंवा दोन हालचालींमध्ये समन्वय न राखता येणे.
कारणाशिवाय अतिशय डोके दुखणे.

यांना जोखीम अधिक

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना पक्षाघाताचा धोका अधिक असतो. तसेच मधुमेह, लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असणार्‍यांना व धूम—पान, मद्यपान करणार्‍यांना देखील याचा धोका निर्माण होऊ शकतो.

ताणतणावाच्या जीवनशैलीमध्ये आपल्या मेंदूचीही काळजी घेणे गरजेचे आहे. आपले न्यूरॉलॉजिकल नेटवर्क जितके स्टाँग तितकेच आपले आरोग्य. यामुळे पक्षाघात संदर्भात जगभरामध्ये जनजागृती करण्यासाठी जागतिक पक्षाघात निवारण दिन दरवर्षी 24 जूनला साजरा केला जातो.

SCROLL FOR NEXT