Latest

पंढरपूर : गोपाळकाल्याने आषाढी वारीची सांगता

दिनेश चोरगे

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : 'गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला' या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूर नगरी लाखो वारकर्‍यांच्या गजराने दुमदुमून गेली. ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपुरात मानाच्या पालख्यांसह सर्व संताच्या पालख्या दाखल झाल्या. गोपाळ काल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन पालख्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. दरम्यान, शुक्रवार, 7 जुलै रोजी श्रींची प्रक्षाळपूजा होणार आहे.

पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथे मानाची अंमळनेरकर महाराजांची दिंडी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे पाच वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. त्यानंतर भजन झाले. गण गण गणात बोते आणि विठू नामाचा जयघोष करीत शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीचे पहाटे 4.30 वाजता गोपाळपुरात आगमन झाले. पहाटेपासूनच एकामागोमाग एक अशा सुमारे 350 संतांच्या दिंड्या, पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या.

सकाळी 9.00 च्या सुमारास जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांची तर 9.30 च्या सुमारास संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. मंदिराजवळ पालख्या विसावल्या. या पालख्यासह संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, चांगावटेश्वर देवस्थान यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचे व दिड्यांचे गोपाळपुरात आगमन झाले.

तत्पुर्वी गोपाळपुर येथील श्रीकृष्ण मंदीरात पहाटे 3.00 वाजता विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पूजा झाल्यानंतर पहाटे 3.30 वाजता श्रीकृष्ण मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांनी मोठ्या श्रध्देने श्री गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली. एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गळाभेट घेतली. श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लाह्यांच्या काल्याचे वाटप करण्यात आले.

संत-देव भेटीचा सोहळा

गोपाळकाला झाल्यानंतर सर्व मानाच्या पालख्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दाखल झाल्या. सर्व संताच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात आल्या. यावेळी देवाची आणि संताची अनुपम भेट घडवून आणण्यात आली. श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यावर हा संतदेव भेटीचा सोहळा पार पडला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT