Latest

पणजी: निवडणूकपूर्व युती न करण्याचा फटका

backup backup

पणजी : विलास ओहाळ

काँग्रेसने 37 जागांवर उमेदवार उभे केले, परंतु त्यांना 11 जागांवर यश मिळाले. काँग्रेसने या निवडणुकीत नवी काँग्रेस असल्याचे सांगत अनेक नवे चेहरे दिले, पण त्याचा परिणाम यशात झाला नाही. निवडणुकीपूर्वी काँ ग्रेसला अनेक पक्षांनी भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्रित येऊ म्हणून हाक दिली होती. परंतु त्यांनी स्वबळाचा हेका धरला होता. हाच हेका त्यांना पुढे अपयशाला कारणीभूत ठरल्याचे उमेदवारांना पडलेल्या मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

बहुरंगी लढती होणरा असल्याने मतांचा फटका काँग्रेसच्या उमेदवारांना बसणार हे निवडणुकीवेळी स्पष्ट दिसत होते. त्यासाठी काँग्रेसला अनेक पक्ष युतीसाठी बरोबर या म्हणून याचना करीत होते. परंतु काँग्रेसच्या नेत्यांना अतिआत्मविश्वास अडचणीचा ठरला असल्याचे दिसून आले.

तृणमूल काँग्रेसनेही काँग्रेसला युतीची हाक दिली होती. शिवसेना-राष्ट्रवादीही एकत्रित या म्हणून सांगत होती. परंतु काँग्रेस युती किंवा आघाडी करण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हती. गोवा फॉरवर्डशी ऐनवेळी युती करून त्यांना तीन जागा देत काँग्रेसने या पक्षाला कात्रित पकडल्याचे स्पष्ट दिसत होते. या पक्षाचे विजय सरदेसाई हे तेवढे फातोर्डातून निवडून आले. नावालाच एक आमदार असल्याची स्थिती फॉरवर्डची झाली आहे.

काँग्रेसने 37 उमेदवार दिले, त्यावेळी पक्षीय उड्या मारल्या जाऊ नयेत म्हणून सर्वांना देव-देवतांच्या शपथाही दिल्या. काँग्रेसला किमान 17 जागांपर्यंत यश मिळेल, अशी आशा होती, पण ती आशा फोल ठरली. भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या मायकल लोबो यांनी पत्नी डिलायला लोबा यांना शिवोलीतून व स्वतः कळंगुटमधून निवडून येत आपले पक्षातील स्थान पक्के केले.

त्याशिवाय साळगावमध्ये केदार नाईक यांना निवडून आणण्याची पेललेली जबाबदारी त्यांनी यशस्वी करून दाखविली. लोबो हे बार्देशमध्ये काँग्रेसचा करीष्मा करतील अशी आशा होती. म्हापसा, पर्वरी, थिवी या ठिकाणी काँग्रेसला यश मिळाले नाही. लोबो यांच्यामुळे पक्षात एकप्रकारे उर्जा आली होती, पण पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसल्याने लोबो यांना पाच वर्षे विरोधी पक्षाच्या बाकावर बसावे लागणार आहे.

पक्षातील विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी 1994 पासून मडगाव मतदारसंघावरील आपली जादू आजतागायत कायम ठेवली आहे. सुरुवातीला भाजप आणि त्यानंतर काँग्रेस असा कामत यांचा प्रवास असला तरी काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा काँग्रेसला किती झाला हा पक्षाला शोधावे लागणार आहे.

आलेक्स सिक्वेरा हे अनुभवी आहेत, त्यांनीही विजय मिळविला असला तरी त्यांच्या वयाचा विचार करता, शारीरिक हालचालीवर मर्यादा आल्या आहेत. सिक्वेरा अनुभवी आहेत, त्यामुळे ते सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडू शकतात.

आठ नवे चेहरे विधानसभेत

केदार नाईक, संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई, डिलायला लोबो, अल्टन डिकॉस्ता, युरी आलेमाव, अ‍ॅड. कार्लुस फरैरा, रुडाल्फ फर्नांडिस हे नवे चेहरे विधानसभेत पोहोचले आहेत. जुन्या दिगंबर कामत, मायकल लोबो आणि आलेक्स सिक्वेरा यांना त्यांच्याकडून सुरुवातीच्या काळात शिकून घ्यावे लागणार आहे. पाच वर्षे पुन्हा एकदा काँग्रेसला विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी लागणार असल्याचे दिसते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT