Latest

पणजी : गोवा पर्यटन व निर्यात हब राज्य होण्याच्या दिशेने : राज्यपाल श्रीधरण पिल्लई

निलेश पोतदार

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर गोवा राज्य हे पर्यटन राज्य आहे. मात्र आता ते निर्यात हब व त्याचबरोबर युटिलिटी विकसित राज्य होण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. गोव्याने सर्व क्षेत्रांमध्ये भरीव प्रगती केली असून, केंद्र व सरकारचे भरीव अर्थसहाय्य गोव्याला मिळत असल्यामुळे गोवा विकसित राज्यांच्या रांगेमध्ये जाऊन बसला आहे असे प्रतिपादन गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरण पिल्लई यांनी आज केले.

गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आज दिनांक 2 फेब्रुवारी पासून सुरु झाले. सुरुवातीला राज्यपालांचे विधानसभेमध्ये आगमन होताच सभापती रमेश तवडकर, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्यपालांचे स्वागत केले. त्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण सुरू झाले. राज्यपालांनी आपल्या भाषणामध्ये गोव्यात हल्लीच संपन्न झालेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा त्याचबरोबर जी २० च्या बैठका आणि आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सव यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल गोवा सरकारचे अभिनंदन केले.
त्याचबरोबर गोव्यामध्ये कायदा व्यवस्था सुरळीत ठेवून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवल्याबद्दलही राज्यपालांनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे अभिनंदन केले. गोवा सरकारने 30 टक्के पोलिसांच्या जागा होमगार्डना राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल ही राज्यपालांनी समाधान व्यक्त केले.

विविध कंपन्या व उद्योगांबरोबर करार करून गोवा सरकारने गोव्यामध्ये उद्योगाची क्रांती केली आहे. डबल इंजिनच्या सरकारमुळे गोव्यात भरीव पायाभूत सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. केंद्राकडून भरीव आर्थिक मदत मिळत आहे. आर्थिक विकासामुळे दरडोई उत्पन्नामध्ये 20 टक्क्याने वाढ झाल्याचे राज्यपाल म्हणाले.

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तत्त्वावर चालताना गोवा सरकारने अंत्योदय, ग्रामोद्योग व सर्वोदय पातळीवर विकास सुरू केला असल्याचे सांगून आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा उपक्रम यशस्वी ठरल्याचे राज्यपाल म्हणाले.

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत राज्यातील 18 विविध प्रकारचे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या 30 हजार जणांची नोंदणी झाल्याचे सांगून एक हजार व्यक्तींना टॅक्सीचे वितरण गोवा सरकारने केल्याचे ते म्हणाले.

दोन लाख 30 हजार 341 कुटुंब दीनदयाळ सामाजिक आरोग्यसुरक्षा योजनेचा लाभ घेत असल्याचे सांगून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 22 हजार कुटुंबांची नोंद झाल्याचे राज्यपाल म्हणाले.

कृषी उत्पादने वाढावीत यासाठी गोवा सरकारने भरीव आर्थिक तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर मच्छी आणि दूध उत्पादन वाढावे यासाठी करोडो रुपयांचे अनुदान सरकार देत आहे. गोव्यात शंभर टक्के सिवरेज जोडणी या वर्षाअखेर दिली जाणार असल्याचे सांगून सध्या चोवीस तास पाणीपुरवठा करणारे गोवा राज्य एकमेव असल्याचे तसेच डेफिनेशन फ्री असलेले गोवा राज्य बणल्याचे राज्यपाल म्हणाले.

गोवा पोलिसांनी 2023 वर्षांमध्ये 3.96 कोटींचा अमली पदार्थ पकडल्याचे सांगून अग्निशामक दलाने वर्षभरामध्ये 87 व्यक्तींचे प्राण वाचवले. त्याचबरोबर 28 जनावरांचे प्राण वाचवले व 19 कोटींची मालमत्ता वाचवल्याचे राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT