Latest

जलराणी बोट प्रकरण : ‘त्या’ बोटीत कोणीही पाकिस्तानी खलाशी नाहीत

स्वालिया न. शिकलगार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा – मुंबई आणि पालघर किनारपट्टीपासून ४४ नौटीकल मैलावर तटरक्षक दलाने पकडलेल्या बोटीत कोणीही पाकिस्तानी खलाशी नाहीत. हा प्रकार गैरसमजातून झाला असल्याचा खुलासा या बोटीला अर्थसाहाय्य करणाऱ्या उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने केला आहे.

सदरची जलराणी ही बोट उत्तन मधील बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची आहे. दोन वर्षांपूर्वी तिला उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत अर्थसाहाय्य केले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष लिओ कॉलासो यांनी दिली आहे.

आज सकाळी ही बोट तटरक्षक दलाच्या जवानांनी त्यात पाकिस्तानी नागरिक असल्याच्या संशयावरून पकडली होती. मात्र यातील सर्वच्या सर्व पंधरा खलाशांची आधार कार्ड आमच्याकडे असून त्यात कोणीही पाकिस्तानी नागरिक नाही, असे कोलासो यांनी सांगितले.
सदरची बोट ही मासेमारीसाठी गेली असून ती संपर्काबाहेर असल्याने तिच्या अलीकडे असणाऱ्या निर्गम या बोटिवरून जलराणी बोटिशी संपर्क साधण्यात आला. उत्तन किनारी तिने परतावे अशा सूचना दिल्या गेल्या आहेत, असं कोलासो यांनी सांगितलं.

ही बोट मासेमारीसाठी सुमारे साडेचार किलोमीटर क्षेत्रात जाळे टाकून असल्याने ते गुंडाळून घ्यायला पाच तास आणि परत येण्यासाठी किमान दोन आणखी तास लागतील, असेही लिओ कोलासो यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT