Latest

PAKvsENG 2nd Test : इंग्लंडची पाकिस्तानवर ऐतिहासिक विजयी आघाडी! 22 वर्षांनी जिंकली कसोटी मालिका

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : PAKvsENG 2nd Test : 17 वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंड संघाने 3 कसोटी सामन्यांची मालिका जिंकत इतिहास रचला आहे. मुलतान येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात त्यांनी पाकिस्तानचा अवघ्या 26 धावांनी पराभव करून मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. मुलतान कसोटीत पाकिस्तानचा संघ मजबूत स्थितीत होता परंतु कसोटीच्या चौथ्या दिवशी असे काही आश्चर्यकारक घडले की इंग्लंडने सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले आणि काही वेळातच सामना सामना खिशात घातला. यापूर्वी 2001 मध्ये इंग्लिश संघाने पाकिस्तानात ती कसोटी सामन्यांची मालिका 1-0 अशी जिंकली होती. त्यानंतर तब्बल 22 वर्षांनी त्यांनी पुन्हा एकदा पाकच्या भूमीवर विजयी पताका फडकवला आहे.

खेळाच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानला विजयासाठी 157 धावांची गरज होती तर इंग्लंड संघाला 6 विकेट्स हव्या होत्या, पण मार्क वुडने भेदक मारा करत पाकिस्तानच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावून घेतला. वुडने दुसऱ्या डावात 4 बळी घेतले.

तत्पूर्वी, मुलतान कसोटीत इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात 281 धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान पाकिस्तानी संघ केवळ 202 धावांवरच गारद झाला. अशाप्रकारे पहिल्या डावाच्या जोरावर इंग्लंड संघाला 79 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. यानंतर, त्यांच्या दुसऱ्या डावातही इंग्लंडने 275 धावांची मजबूत धावसंख्या उभारली, ज्यामुळे त्यांनी पाकिस्तानसमोर 335 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात 328 धावांवर गारद झाला.

355 धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या हातात अडीच दिवसांचा कालावधी होता. अशातच त्यांच्या दुसऱ्या डावाच्या फलंदाजीची सुरुवात अश्वासक झाली. पण हळूहळू असे काही घडले की इंग्लंडने सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले. पाकच्या दुसऱ्या डावात अब्दुल्ला शफीकने 45 धावांची खेळी केली. कर्णधार बाबर आझम केवळ 1 धावा पॅव्हेलियनमध्ये परतला. सौद शफीकने 94 धावांची खेळी करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवले. त्याला इमाम-उल-हकची (60) चांगली साथ मिळाली. प्रथम इमाम-सौद यांची शतकी भागीदारी आणि नंतर सौद-नवाझ यांनी केलेल्या 80 धावांच्या भागीदारीमुळे पाकिस्तानला बळ मिळाले. पण या भागीदारी व्यतिरिक्त एकही फलंदाज मैदानावर टिकू शकला नाही आणि एकामागोमाग एक ते तंबूत परतले. दुसऱ्या डावात मार्क वुडने भेदक मारा करत इंग्लंडसाठी चमत्कार घडवून आणला. त्याने पाकिस्तानच्या फलंदाजीला खिंडार पाडले आणि मोक्याच्या क्षणी 4 बळी मिळवले. तर जेम्स अँडरसन, ओली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी 2-2 तर जॅक लीच, जो रूटने 1-1 विकेट मिळवून संघाच्या विजयात वाटा उचलला. (PAKvsENG 2nd Test)

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका (पाकिस्तानमध्ये)

• 1961/62 : 3 सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली
• 1968/69 : 3 सामन्यांची मालिका 0-0 बरोबरीत
• 1972/73 : 3 सामन्यांची मालिका 0-0 बरोबरीत
• 1977/78 : 3 सामन्यांची मालिका 0-0 बरोबरीत अशी बरोबरीत आणा
• 1983/83 : 3 सामन्यांची मालिका पाकिस्तानने 1-0 जिंकली
• 1987/88 : 3 सामन्यांची मालिका पाकिस्तानने 1-0 जिंकली
• 2000/01 : 3 सामन्यांची मालिका इंग्लंडने 1-0 जिंकली
• 2005/06 : 3 सामन्यांची मालिका पाकिस्तानने 2-0 जिंकली
• 2022/23 : 3 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडची 2-0 ने विजयी आघाडी (Pak vs Eng 2nd Test)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT