Latest

हल्दवानी हिंसाचारामागे पाकिस्तानचे टूलकिट

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : हल्दवानी येथे अतिक्रमण काढण्यास आलेल्या महापालिका कर्मचारी व पोलिसांविरुद्ध विशिष्ट समुदायाकडून झालेल्या हिंसाचारामागे पाकिस्तानी टूलकिटचा हात असल्याचा अहवाल गुप्तचर संस्थांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला दिला आहे. तपासादरम्यान याबाबतचे पुरावेही उपलब्ध झाले आहेत. हल्दवानीतील हिंसाचार काही सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आलेल्या चिथावण्यांचा परिणाम होता. सायबर चौकशीत हे सर्व अकाऊंट पाकिस्तानमधून संचलित असल्याचे समोर आले आहे.

या संपूर्ण घटनाक्रमात पाकिस्तानातील यंत्रणाही सहभागी होत्या, असे गृह मंत्रालयाला देण्यात आलेल्या या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. न्यायालयाने बनभूलपुरा भागातील अवैध तसेच अतिक्रमित मदरसा तसेच नमाजाची इमारत पाडण्यावर स्थगिती देण्यास नकार देताच पाकिस्तानने या भागात दंगल घडवण्याच्या इराद्याने टूलकिट तयार केले. यासाठी मोहम्मद अख्तर, आसिफ पॉलिटिक लेस, मोहम्मद आलम, अरकाम, आलम शेख आणि आसिफ मन्सुरी या नावांनी 10 बॉट आधारित ट्विटर (आता एक्स) हँडल सक्रिय करण्यात आले.

नऊ हॅशटॅग सक्रिय

हल्दवानी घटनेनंतर पाकिस्तानच्या कराची, इस्लामाबाद, एबोटाबाद आणि लाहोरमधून त्वरित 9 हॅशटॅग सक्रिय झाल्याचे पुरावेही गुप्तचर संस्थांच्या हाती लागले आहेत. हल्दवानी बर्निंग, हल्दवानी राईटस्, हल्दवानी व्हायोलन्स या शब्दांचा प्रयोग करून चिथावणीखोर पोस्ट टाकण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे.

SCROLL FOR NEXT