Latest

पाकिस्तान संघाचे आज आगमन

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात होणार्‍या वन-डे वर्ल्डकप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ आज (बुधवारी) हैदराबाद येथे दाखल होईल. न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळल्यानंतर मुख्य फेरीत त्यांचा पहिला मुकाबला नेदरलँडविरुद्ध 6 ऑक्टोबरला होणार आहे. पाकिस्तानचा संघ भारतात दाखल होण्यापूर्वीच बरेच वाद झाले. त्यात भर पडली ती व्हिसा मान्यतेची. पाकिस्तानी पत्रकारांकडून भारत मुद्दाम पाकिस्तान क्रिकेट संघाला व्हिसा देण्यास विलंब करत असल्याचा आरोप झाला; पण अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेच अपेक्षेपेक्षा लवकर व्हिसा मंजूर केल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानून पाकिस्तानी पत्रकारांची कानउघडणी केली अन् सत्य सांगितले.

आशिया चषक स्पर्धेत मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानी संघ आता वर्ल्डकपची तयारी करत आहे. भारतात येणार नाही, असा सूर गेल्या काही महिन्यांपासून 'पीसीबी'चा होता. त्यात व्हिसा मिळत नसल्याची आवई उठवण्यात आली होती; पण भारताने पाकिस्तानी संघाला व्हिसा मंजूर केला आहे. पाकिस्तानी संघाला 27 सप्टेंबरला हैदराबादला पोहोचायचे आहे. दोन दिवस आधीच भारताने व्हिसा मंजूर केला आहे. पाकिस्तानने 19 सप्टेंबरला व्हिसासाठी अर्ज केला होता. यामुळे लवकरात लवकर प्रक्रिया आटोपून भारताने व्हिसा मंजूर केला आहे.

या सर्व घडामोडींवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अखेर मौन सोडले. त्यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाला व्हिसा लवकरात लवकर दिल्याबद्दल भारत सरकार आणि 'बीसीसीआय' सचिव जय शाह यांचे आभार मानले. पत्रकारांना खोट्या बातम्या न देण्याचे आवाहन केले.

हे क्रिकेट आहे, युद्ध नाही : रौफ

भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान आपल्या संघात आक्रमकतेची कमतरता भासत आहे का? असा सवाल करणार्‍याला पाकिस्तानचा आघाडीचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने खडसावले. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत हॅरिस रौफने सांगितले की, त्यांचा संघ भारताविरुद्धच्या सामन्यात क्रिकेट खेळण्यासाठी जात आहे, युद्ध करण्यासाठी नाही.

रौफ म्हणाला की, मी भारतीयांशी का लढू? हे क्रिकेट आहे, युद्ध नाही. कोणत्याही मोठ्या स्पर्धेत देशासाठी खेळणे खूप मोठी गोष्ट असते. माझा फिटनेस पूर्वीपेक्षा चांगला आहे. आम्हाला आमच्या संघावर पूर्ण विश्वास आहे. मला नवीन चेंडू मिळणार की जुना याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेईल. विश्वचषकासाठी माझे कोणतेही विशिष्ट ध्येय नाही. अधिक लक्ष सांघिक कामगिरीवर आहे, असे रौफ याने सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT