Latest

PAK vs WI : बाबर आझमचा विश्वविक्रम; विराट कोहलीला टाकले मागे!

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमधील मुल्तान येथे तीन सामन्यांच्या मालिकेतील खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात (PAK vs WI) यजमान पाकिस्तान संघाने वेस्ट इंडिजला ५ विकेट्सने हरवले. यावेळी पुन्हा एकदा पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) करिष्माई खेळी खेळली. बाबरने १०३ धावांची खेळी करत अनेक जागतिक विक्रम मोडीत काढले. ज्यात सर्वात वेगवान १७ वनडे आंतरराष्ट्रीय शतके ठोकण्याच्या विक्रमचा समावेश आहे. बाबरने त्याच्या कारकिर्दीतील ८५ व्या डावांत हा कारनामा करत दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज सलामी फलंदाज हाशिम अमला याला मागे टाकले. अमलाने ९८ डावांत १७ वनडे आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. या ऐतिहासिक खेळीच्या दरम्यान बाबर आझमने कर्णधार म्हणून सर्वात वेगवान १ हजार धावा बनविण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावे केला. हा विक्रम याआधी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर होता.

बाबर आझमने १०७ चेंडूत ९ चौकाराच्या मदतीने ही खेळी केली. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करत ५० षटकांत ८ विकेट गमावून ३०५ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून शाई होपने १२७ धावांची खेळी केली. हे लक्ष्य पाकिस्तानने ४९.२ षटकांत ५ विकेट गमावून पार केले. यामुळे पाकिस्तानने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पाकिस्तानकडून इमाम उल हकने ६५ धावा कुटल्या. तर खुशदिल शाहने २३ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या. त्याशिवाय मोहम्मद रिजवानने ५९ धावांची खेळी केली.

शतकांची हॅटट्रिक

बाबर आझमच्या सर्वात वेगवान १७ शतकांचा विचार केला तर हा विक्रम याआधी हाशिम अमलाच्या नावावर होता. या यादीत विराट कोहली तिसऱ्या स्थानावर गेला आहे. विराटला १७ वनडे आंतरराष्ट्रीय शतके करण्यासाठी ११२ डाव खेळावे लागले. तर ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नरने ११३ डाव खेळत ही कामगिरी केली होती. याशिवाय बाबर आजम असा फलंदाज बनला आहे ज्याने दोनवेळा वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांत शतकांची हॅटट्रिक केली आहे.

बाबरची कामगिरी

बाबरने वनडे आंतरराष्ट्रीय करियरमध्ये ८७ सामन्यांत ८५ डाव खेळत ५९.७८ च्या सरासरीने ९०.४३ स्ट्राइक रेटने एकूण ४,३६४ धावा केल्या आहेत. त्यात १७ शतके आणि १८ अर्धशतकांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT