Latest

Pak team welcome Controversy : अहमदाबादच्या हॉटेलमध्ये पाक संघाच्या जल्लोषी स्वागतावर नेटिझन्स नाराज(Video)

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Pak team welcome Controversy : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत. 14 ऑक्टोबरला खेळल्या जाणा-या या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तत्पूर्वी, दोन्ही संघाचे खेळाडू अहमदाबादला पोहोचले आहेत. दरम्यान, पाकिस्तानी संघ ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहे, तेथे या संघाच्या स्वागताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यावरून नेटीझन्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या सुरू असलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघ अहमदाबादला 12 ऑक्टोबर रोजी पोहोचला. पाकच्या संघाची सोय अहमदाबादमधील रिजेंसी हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. अहमदाबादमधील सर्वात महागड्या हॉटेलमध्ये रिजेंसीची गणना होते. पाकिस्तान संघाचे येथे गुरुवारी आगमन झाले. यावेळी पाकच्या खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये पाक संघाच्या स्वागतावेळी काही नृत्यांगणा परंपरिक नृत्य सादर करताना दिसत आहेत. यावेळी लोकप्रिय बॉलीवूड गाण्यांचा आवाज ऐकू येत आहे. तसेच हॉटेलच्या आवारात फुगे आणि फुलांची सजावट केल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्सनी आगपाखड करत थेट बीसीसीआयवरच टीकेची झोड उठवली आहे. (Pak team welcome Controversy)

'पाकिस्तानी संघाचे जंगी स्वागत म्हणजे घृणास्पद!'

'हे घृणास्पद आहे! पाकिस्तानी संघाचे स्वागत करण्यासाठी मुली पारंपरिक नृत्य करताना दिसत आहेत! हे पूर्णपणे चुकीचे आहे. आयसीसीच्या कार्यक्रमाच्या नावाखाली पाकिस्तान संघाला व्हिसा देणे पुरेसे होते. पण बीसीसीआय प्रसिद्धी आणि पैशासाठी का म्हणून पाकच्या संघाचा एवढा उदो उदो करत आहे?' असा सवाल एका वापरकर्त्याने केला आहे. (Pak team welcome Controversy)

आर्थिक फायद्यासाठी प्रसिद्धी

आणखी एक वापरकर्ता रोशन रायने म्हटले आहे की, 'इतर संघ सामन्याच्या ठिकणी गेले तेंव्हा त्यांचे स्वागत फक्त पुष्पगुच्छ देऊन आणि टाळ्या वाजवून करण्यात आले. पण पाकिस्तान संघाचे विशेष स्वागत केले जात आहे. याला एकमेव कारण म्हणजे बीसीसीआयला आर्थिक फायद्यासाठी सामन्याची प्रसिद्धी करायची आहे.' (Pak team welcome Controversy)

'लाल गालिचा पांघरूण स्वागत'

मिस्टर सिन्हा नावाचा वापरकर्ता म्हणतो, पाकिस्तानकडून नियमितपणे भारतीय सैनिक आणि नागरिकांच्या हत्येत गुंतला आहे. याच कारणामुळे आपण गेली अनेक वर्षे त्यांच्यावर क्रिकेट खेळण्यावरून बहिष्कार घातला आहे. पण आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये संघ आमनेसामने येतात. सध्या पाकचा संघ वर्ल्डकपसाठी भारतात आला आहे. येथे त्यांच्या खेळाडूंना सामान्यपणे ट्रीट करणे आवश्यक होते. पण बीसीसीआय पाक संघातील खेळाडू जिथे जातील तेथे लाल गालिचा पांघरूण त्यांचे स्वागत करत आहे. असे करून बीसीसीआय आपला मौल्यवान वेळ वाया घालवत आहे,' असा सल्ला त्याने दिला आहे.

'…तर हा व्हिडिओ दाखवावा'

"पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला "परंतु सैनिक सीमेवर लढत आहेत" असा युक्तिवाद करेल तेव्हा त्यांना जय शाह यांच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयकडून पाकिस्तान संघाचे भारतात स्वागत कसे केले जात आहे, याचा हा व्हिडिओ दाखवावा," असे आणखी एका वापरकर्त्याने पोस्ट केले आहे.

'पाकसोबत द्विपक्षीय मालिका का होऊ शकत नाही?'

दुसर्‍या एक्स वापरकर्त्याने म्हटंलय की, 'बीसीसीआयने पाकिस्तानी संघाचे विशेष स्वागत करण्यासाठी इतकी गुंतवणूक केली असेल तर पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका का होऊ शकत नाही?' असा प्रश्न उपस्थित केला आहे.

'हे प्रत्येक संघासाठी अपमानास्पद'

'हे प्रत्येक संघासाठी अपमानास्पद आहे. तुम्ही यजमान असताना, प्रत्येक संघ तुमच्यासाठी समान असतो. नेदरलँड देखील पाकिस्तानइतकेच महत्त्वाचे आहे,' असे हार्दिक राजगोर यांनी पोस्ट केले आहे.


नरेंद्र मोदी स्टेडियममधील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी आयोजकांनी एका खास कार्यक्रमाची योजना आखली आहे. सामन्याच्या आधी बॉलीवूड तारे-तारकांच्या नृत्याचा एक कलाविष्कार सादर केला जाणार आहे. असा 'विशेष कार्यक्रम' इतर कोणत्याही सामन्यासाठी झालेला नाही. तसेच बीसीसीआयने विश्वचषकापूर्वी उद्घाटन समारंभकेवळ इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानेच केला होता. त्यामुळे पाकिस्तानी संघाला दिल्या जाणा-या व्हीआयपी वागणूकीने अनेक चाहते बीसीसीआयवर नाराज झाले आहेत.

SCROLL FOR NEXT