Latest

पुणे: शेतातील मोटार केबल चोरांच्या मुसक्या आवळल्या, ओतूर पोलिसांची यशस्वी कामगिरी

अमृता चौगुले

ओतूर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: अलीकडच्या काळात उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतात असणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारीचे केबल मोठ्या प्रमाणात चोरी जाण्याच्या घटना घडल्या होत्या. या चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. विजय शिवाजी बर्डे (रा. सोमतवाडी, ता. जुन्नर) आणि कृष्णा गोकुळ पवार (रा. कुंदेवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

ओतूर पोलिसांनी रविवारी (दि. १४) मध्यरात्री खामुंडी ते बदगी घाटाकडे जाणाऱ्या मार्गावर व पिंपरी पेंढार ते म्हसवंडी घाटाकडे जाणाऱ्या मार्गावर नाकाबंदी केली होती. यावेळी पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास उंब्रज मार्गावरून आलेल्या दुचाकीवरील दोघांना पोलिसांनी हटकले. ते दोघे त्यांच्या जवळील गोणीत काहीतरी घेऊन जात होते. दुचाकीस्वार संशयास्पदरित्या पिंपरी पेंढारकडे वेगाने निघुन गेले. गस्तीवरील पोलिस पथकाने लागलीच त्यांचा पाठलाग करून त्यांना गायमुखवाडी हद्दीत पकडले. त्यांच्याकडील गोणीची पाहणी केली असता त्यात इलेक्ट्रिक मोटारीच्या केबल आढळून आल्या. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल विचारपुस करता त्यांनी उंब्रज नं.१ गावच्या हद्दीतील दांगटपट बंगलावस्ती परिसरातील शेतकऱ्यांची केबल चोरून घेऊन जात असल्याची कबुली दिली.

शेतकरी विलास दगडु कुटे, सुदर्शन दत्तात्रय काकडे, उमेश माधव दांगट, नयन विठ्ठल हांडे, किसन मगन दुरगुडे, रामदास गणपत वेठेकर आणि विठ्ठल सोपान दुरगुडे या शेतकऱ्यांची उंब्रज नं. १ गावच्या हद्दीतील येडगाव धरणाच्या पाणीसाठ्यात बसविलेले इलेक्ट्रिक पाण्याचे मोटारीची केबल चोरीस गेल्याचे आढळले. या केबलची किंमत १ लाख ८० हजार रुपये असून एकूण १२०० मीटर लांबीची केबल चोरीस गेले होती.

विजय बर्डे आणि कृष्णा पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडील चोरलेली केबल व एक दुचाकी (एमएच १५ जेजी ४९९२) असा माल जप्त केला आहे. ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचा तपास पोलिस नाईक एस. आर. लांडे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT