Latest

रत्‍नागिरी : बाम लावलेल्‍या गुरूजींना फुटला घाम; शिक्षणाधिकाऱ्यांकडून वैद्यकीय बिलांच्या चौकशीचे आदेश

निलेश पोतदार

रत्नागिरी ; दीपक कुवळेकर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांचा विषय सध्या चांगलाच गाजत आहे. 'बाम' लावून त्‍याचे बील सादर करणाऱ्या गुरुजींना आता चांगलाच घाम फुटला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी या वैद्यकीय बिलांची चौकशी करावी, असे आदेश गटशिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत. त्यानुसार सर्व शिक्षकांना सोमवारी नोटीसही काढल्या आहेत.

कर्मचार्‍यांची वैद्यकीय बिले नेहमीच वादात सापडतात. विशेषकरून शिक्षकांची बिले तर चर्चेत आहेत. लांजा तालुक्यातील 550 शिक्षकांपैकी तब्बल 334 शिक्षकांनी आजारी असल्याचे दाखवत वैद्यकीय बिलांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे सादर केले होते. याबाबत दै. पुढारीने सोमवारी वृत्त प्रसिद्ध करत आवाज उठवला होता. वृत्त प्रसिद्ध होताच शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती.
बिलांचे प्रस्ताव सादर केल्यानंतर काही अधिकार्‍यांनीही याला आक्षेप घेतला होता. शेवटी शिक्षणाधिकार्‍यांनी या सर्व प्रकाराबाबत चौकशी करावी, आणि नंतरच बिले सादर करावीत, असे आदेश पंचायत समितीला काढले. त्यानुसार या सर्व शिक्षकांना सध्या कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चार दिवसांत या नोटीसला उत्तर देणे या शिक्षकांना बंधनकारक असणार आहे.

अशी आहे नोटीस

शासकीय रुग्णालयामध्ये बाह्य रुग्ण उपचारांसाठी प्राप्त झालेल्या देयकाची पडताळणी केली असता टॉनिक्स ऍसिडिटी च्या गोळ्या, टॉनिकच्या कॅप्सुल, रक्तवाढीच्या गोळ्या, पॅरासिटॅमॉल, कफ सिरप, हर्बल प्रोडक्ट ट्रिपल एक्स चार्जेस प्रायव्हेट, हॉस्पिटलची बिले, ओआरएस पावडर ही सर्व औषधे शासकीय रुग्णालयाकडे उपलब्ध असताना बाहेरून खरेदी करून वैद्यकीय देयके सादर केलेली दिसून येत आहेत. सदर बाबी गंभीर असून जिल्हा परिषद सेवा शिस्त व अपिल नियम 1964 नुसार शिस्तभंग विषय कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा करावा.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT