Latest

चिपळूणमध्ये सरकारच्या आशीर्वादाने बाहेरील गुंड मागवून राडा : विजय वडेट्टीवार

निलेश पोतदार

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा चिपळूणमध्ये सरकारच्या आशीर्वादाने बाहेरील गुंड मागवून राडा करण्यात आला. राडा संस्कृतीला सरकारकडून खतपाणी घातले जात आहे. त्यामुळे राज्यातली कायदा सुव्यस्था धाब्यावर आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधीला सत्तेचा माज असल्याने हा राडा केला असून, हा सत्तेचा माज जनताच उतरवेल. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला सत्ताधारी लोकप्रनिधींकडून वारंवार गालबोट लावले जात आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी वारंवार समाज विघातक कृत्ये करत असल्याने महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधीचा बुरखा पांघरून दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा त्यांनी निषेध केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यस्था राहिली नाही. सत्ताधारी आमदाराने पोलीस ठाण्यात गोळीबार केला. ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांच्यावर झुंडशाहीने पोलिसांसमोर जीवघेणा हल्ला केला. आता चिपळूणमध्ये पोलिसांसमोर सत्ताधारी लोप्रतिनिधीने राडा केला. यामध्ये सर्वसामान्य जनतेसोबत पोलीस देखील जखमी झाले. सत्तेचा दबाव पोलिसांवर असल्याने पोलिसांना बघ्याची भूमिका घ्यावी लागतेय, हे दुर्दैव आहे. लोकप्रतिनिधीचा बुरखा पांघरून दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला सरकारने वेळीच आवर घातला पाहिजे. अन्यथा राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होईल. याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. कर्नाटकात सत्तेची मस्ती आलेल्या भाजपच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सर्वसामान्य नागरिकांनी कसे पिटाळून लावले होते. हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. तशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होणार नाही यासाठी सरकारने वेळीच खबरदारी घेतली पाहिजे.

चिपळूणमध्ये शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर पोलिसांनी कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु तसे न करता या गुंडांना पाठीशी घातले जात आहे. पोलिस एकतर्फी कारवाई करत आहेत. चिपळूणची संस्कृती बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोरच मुद्दाम गोंधळ घातला गेला. यासाठी बाहेरून गुंड, हत्यारे मागविण्यात आली. हे सगळं कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहे. हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली आहे.

चिपळूणमध्ये पोलिस कर्मचारीही जखमी झाले. या दगडफेकीत काहींच्या डोक्याला, हाताला, तोंडाला गंभीर दुखापत झाली. जमावास पांगवताना झालेल्या लाठीमाराचा फटका एका पत्रकारासही बसला. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांची तोफफोड करण्यात आली. सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले गेले. तरी देखील सरकार पक्षीय भेद करून कारवाई करत असल्याचा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला आहे. दोषींवर पक्षीय भेद न करता कडक कारवाई करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT