Latest

Opposition Iphone: सरकार पाळत ठेवत असल्याचा विरोधकांचा नवा हल्लाबोल

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: मोबाईलमध्ये शिरकाव करण्याचा सरकारपुरस्कृत प्रयत्न होत असल्याची चेतावणी अॅपल कंपनीकडून आल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे. अशा प्रकारातून सरकार पाळत ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांनी अदानींना कचाट्यात पकडल्यामुळे सरकार चवताळले असल्याची तोफ काँग्रेस नेते राहुल गांधींनी डागली. (Opposition Iphone)

काँग्रेस नेते राहुल गांधींनी पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन या पाळत प्रकरणावरून मोदी सरकारवर कडाडून प्रहार केले. जुलमी राजाचे प्राण पिंजऱ्यातील पोपटात असल्याची गोष्ट सांगून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींचे प्राण अदानींमध्ये असल्याची खोचक तुलना केली. अदानींना हात लावताच तपास यंत्रणा चवताळतात. आधी वाटत होते की सत्तेची क्रमवारी प्रथम नरेंद्र मोदी, नंतर अंबानी आणि मग अमित शाह अशी आहे. मात्र प्रत्यक्षात हा क्रम अंबानी, मोदी मग अमित शाह असा आहे. परंतु, विरोधकांनी पोपटाला असे पकडले आहे की, तो वाचू शकत नाही. (Opposition Iphone)

देशाचे लक्ष पिंजऱ्यातील पोपटाकडे जाऊ नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणाले, सर्व विरोधी नेत्यांना अॅपलकडून सूचना आली आहे की, सरकार पुरस्कृत हल्लेखोर फोन आणि ईमेल हॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. अशाच प्रकारचा इशारा काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आल्याचा दावा राहुल गांधींनी केला. यामध्ये अखिलेश यादव, सीताराम येचुरी, राघव चड्डा, टी. एस. सिंहदेव, महुआ मोईत्रा अशी अनेक नावे आहेत. या सर्वांचा अदानी प्रकरणाशी संबंध आहे, असे सांगताना राहुल गांधींनी "हवे तेवढे टॅपिंग करा, याने काहीही फरक पडणार नाही. आपला फोन हवा असेल तर घेऊन जा", अशा शब्दात सरकारला आव्हान दिले आहे. (Opposition Iphone)

Opposition Iphone: सरकारची दया वाटते-कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा

तत्पूर्वी, लोकसभेमध्ये पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या आरोपांमुळे अडचणी आलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी या प्रकरणाचा संबंध अदानींशी जोडून पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्री कार्यालयाला लक्ष्य केले. सरकार माझा फोन आणि इमेल हॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याची चेतावणी अॅपलकडून मिळाली. गृह मंत्रालयाने आता नवे काही तरी करावी. अदानी आणि पंतप्रधान कार्यालयाच्या दमबाजीनंतरच्या या भीतीमुळे तुमची दया वाटते असा टोला महुआ मोईत्रा यांनी सोशल मिडिया एक्सवरील पोस्टद्वारे लगावला.

विरोधी पक्षाच्याया नेत्यांना सरकार पुरस्कृत हल्ल्याचा संदेश

दरम्यान, एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह विरोधकांच्या इंडिया आघाडीतील पक्षांच्या अन्य नेत्यांनीही सोशल मिडिया एक्सवर ट्विट करून मोबाईलवर सरकार पुरस्कृत हल्ले केले जात असल्याची आरोपांची फैर झाडली आणि केंद्र सरकारवर सडकून टिका केली. अॅपल कंपनीकडून अशा प्रकारे इशारा देणारे संदेश आलेल्या नेत्यांमध्ये आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, कॉंग्रेस खासदार शशी थरूर, राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा, कॉंग्रेस प्रवक्ते पवन खेडा, सुप्रिया श्रीनेत, के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश होता. या सर्व नेत्यांनी आलेल्या इशारा संदेशाचे स्क्रिन शॉट जोडून सरकारला लक्ष्य करणारे ट्विट केले.

विरोधकांना आलेल्या संदेशात काय म्हटले आहे?

अॅपलच्या या संदेशात इशारा देण्यात आला आहे की, सरकार पुरस्कृत हल्लेखोर अॅपल आयडीशी संबंधित आयफोनमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही कोण आहात किंवा काय करतात याआधारे हल्लेखोर तुम्हाला व्यक्तिगतपातळीवर लक्ष्य करत आहेत. तुमच्या उपकरणाशी छेडखानी झाली असेल तर हल्लेखोर दूर अंतरावरून संवेदनशील डेटा, संपर्क, कॅमेरा तसेच मायक्रोफोनवर ताबा मिळवू शकतात. हा चुकीचा इशारा असल्याचीही शक्यता आहे मात्र हा इशारा गांभीर्याने घ्यावा, असेही या संदेशात नमूद करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT