Latest

‘मिशन २०२४’साठी भाजप विराेधक सरसावले, पाटणामध्‍ये उद्या पहिली बैठक

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधी आघाडी तयार करण्‍याच्‍या हेतूने शुक्रवार, २३ जून रोजी विरोधी पक्षांची पाटणा येथे बैठक हाेणार आहे. ( Opposition parties meeting) विरोधी आघाडीची रणनीती आणि निवडणुकीला सामोरे जातान 'किमान समान कार्यक्रम' कसा असावा, या दोन प्रमुख मुद्यावर या बैठकीत चर्चा होईल, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.
विरोधी पक्ष नेत्‍यांच्‍या बैठकीचे यजमानपद बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्‍यमंत्री आणि 'आप'चे निमंत्रक अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

Opposition parties meeting : विरोधकांसाठी ही पहिली पायरी

भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्यासाठी ही बैठक पहिली पायरी असेल असे मानले जात आहे. जागावाटपाच्या वादग्रस्त मुद्द्यासह विरोधी एकजुटीसाठी किमान समान कार्यक्रम कसा असावा, यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

'जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता नाही'

ही फक्त सुरुवात आहे. विरोधी पक्षांच्‍या एकजुटीसाठी बैठक महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. पहिल्‍या टप्प्यात निवडणूक रणनीती आणि जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता नाही," असे एका ज्येष्ठ विरोधी पक्षनेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितल्‍याचे 'पीटीआय'ने म्‍हटले आहे. विरोधी पक्ष एकत्रितपणे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी जे मुद्दे उपस्थित करतील तेच या बैठकीत चर्चेत येतील तसेच यावेळी मणिपूर हिंसाचार आणि केंद्राचे कथित अपयश यावर चर्चा होण्याची शक्यता असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

आपच्‍या मागणीला काँग्रेस पाठिंबा देणार?

आता या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. या बैठकीत दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल हे सर्व विरोधकांनी दिल्‍लीतील प्रशासकीय सेवांवर नियंत्रण ठेवण्याच्या केंद्र सरकारच्‍या अध्यादेशावर पाठिंबा देण्‍याची मागणी करतील. २३ जूनच्या बैठकीत काँग्रेस केंद्राच्या अध्यादेशाबाबत आपली भूमिका स्पष्ट करेल, अशी आशा केजरीवाल यांनी मंगळवारी व्यक्त केली होती. त्‍यामुळे आता याप्रश्‍नी काँग्रेस कोणती भूमिका घेणार हे महत्त्‍वाचे ठरणार आहे.

पश्‍चिम बंगालमध्‍ये सत्ताधारी तृणमूल आणि विरोधी पक्ष संघर्षाचा तिढा

पश्‍चिम बंगाल पंचायत निवडणुकीनिमित्त सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष आमने-सामने आले आहेत. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील महसूल कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्‍यांचे हे आंदोलन आहे. त्‍यामुळे शुक्रवारच्‍या बैठकीत या प्रश्‍नी तृणमूल काँग्रेस कोणती भूमिका घेणार हेही पाहणे महत्त्‍वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी आघाडी जिंकू शकते : डी. राजा

सीपीआयचे सरचिटणीस डी राजा, जे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, 'योग्य दिशेने' एक पाऊल असे सांगत त्‍यांनी या बैठकीचे स्‍वागत केले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर बैठक होत आहे. यावर्षी अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत, यामुळे पाटणा येथे विरोधी पक्षाची बैठकीत महत्त्‍वाची असेल. धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी पक्ष एकत्र येणे हा एक अतिशय सकारात्मक संदेश आहे डी. राजा यांनी सांगितले. २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी आघाडी जिंकू शकते असा विश्वास व्यक्त करून राजा म्हणाले की, भाजपला पराभूत करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट लक्षात घेऊन धर्मनिरपेक्ष लोकशाही पक्षांनी एकत्र काम केले पाहिजे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, सीपीआय (एम) सरचिटणीस सीताराम येचुरी आणि सीपीआय (एमएल) सरचिटणीस दीपांकर भट्टाचार्य यांनी बैठकीला उपस्‍थित राहणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. आता शुक्रवार २३ जून रोजी होणार्‍या या बैठकीकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT