Latest

Ganeshotsav 2023 : कुणी दुचाकीवर… कुणी रिक्षात; अवघे पुणे शहर गणेशमय

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : डोक्यावर पांढरीशुभ्र टोपी… कपाळावर भगवी पट्टी… हातात घंटी आणि मुखी 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष…, शहरातील गल्लीबोळांमध्ये आकर्षक फुलांनी सजविलेले रथ… त्यांच्यासमोर लागलेल्या ढोल पथकांच्या रांगा आणि भक्तांच्या चेहर्‍यावर नवचैतन्य, अशा भक्तिमय आणि उत्साही वातावरणात मंगळवारी पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी आपापल्या बाप्पाची विधिवत प्रतिष्ठापना केली. मागील अनेक दिवसांपासून असलेली आतुरता संपली आणि लाडके बाप्पा मंडपात विराजमान झाल्याने आबालवृद्धांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

देशातील आणि जगभरातील गणेशभक्तांचे आकर्षण असलेल्या पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवास मंगळवारी दणक्यात प्रारंभ झाला. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे मिरवणुकीने उत्सव मंडपात आगमन झाले आणि विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. बहुसंख्य मिरवणुकींमध्ये ढोल-ताशा पथकांचा सहभाग होता. मानाच्या पाच गणपतींसह मध्य पेठांमधील बहुसंख्य गणेश मंडळांच्या बाप्पांची दुपारपर्यंत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

पेठांमधील मिरवणुकांमध्ये ढोल-ताशांसह बँन्ड पथकांचाही समावेश होता. तर उपनगरांमधील बहुसंख्य सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या मिरवणुका सायंकाळच्या सुमारास काढण्यात आल्या. मिरवणुकांमध्ये डीजेचा दणदणाट फारसा दिसला नाही. उपनगरांमधील काही मंडळे वगळता सर्वांनी ढोल पथकांचा मिरवणुकीमध्ये समावेश केला होता.

घराघरात बाप्पाचे जंगी स्वागत…

घराघरामध्ये सकाळपासून बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती. महिला वर्ग नैवेद्यासाठी मोदक करण्याच्या तयारीत मग्न होता. सकाळी आठ ते सायंकाळी उशिरापर्यंत शहरात 'गणपती बाप्पा मोरया' चा जल्लोष सुरू होता. घरोघरी 'श्रीं'ची विधिवत प्रतिष्ठापना करून आरती करून नैवेद्य दाखविण्यात आला. अनेकांनी बाप्पाच्या स्वागताची क्षणचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली. बाप्पाच्या आगमानाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर करण्यात आली, तर व्हॉट्सअ‍ॅपवर घरगुती बाप्पाची आणि सजावटीची छायाचित्रे अनेकांनी पोस्ट करत आनंद द्विगुणित केला. तर घरगुती गणपतीसोबतचा खास सेल्फीही तरुणाईने शेअर केला अन् त्यावर लाईकचा वर्षावही झाला.

कुणी दुचाकीवर… कुणी रिक्षात

गणरायाची मूर्ती घरी नेण्यासाठी सकाळपासूनच गणेश मूर्तीच्या स्टॉलवर भाविकांची गर्दी झाली होती. मध्यवर्ती पेठांसह, जंगली महाराज रस्ता, डेक्कन परिसर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता व उपनगरच्या भागात 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करीत बाप्पाला घरी नेताना भक्तजन सहकुटुंब पारंपरिक वेशभूषेत दिसून आले. कोणी दुचाकीवर, कोणी चारचाकीत, कोणी रिक्षात, तर कोणी टेम्पोत बाप्पाला उत्साहाने घरी घेऊन जाताना दिसत होते. काहींनी पारंपरिक वेशभूषेत जयघोष करत बाप्पाला घरी नेले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT