Latest

Ram Temple idol consecration ceremony : २२ जानेवारीला अयोध्येत फक्त निमंत्रितांना प्रवेश

Arun Patil

अयोध्या, वृत्तसंस्था : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी 22 जानेवारीला गर्दीमुळे अप्रिय घटना घडू नये म्हणून ज्यांना रामलल्लाचे निमंत्रण आहे, असेच लोक अयोध्येत या दिवशी दाखल होऊ शकतील, असा दंडक करण्यात आला आहे. सरकारी कर्तव्यावर तैनात लोक मात्र या दंडकाला अपवाद असतील. 23 ला मात्र दर्शन सर्वांसाठी खुले राहील. निमंत्रितांसाठी निवासाची सुविधा अपुरी येऊ नये म्हणून 22 तारखेला लागून अयोध्येतील सर्वच हॉटेल्स, लॉजिंग-बोर्डिंगमध्ये झालेले खोल्यांचे बुकिंग (आरक्षण) रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जारी केले आहेत.

शंभरावर विमाने येणार

राजकीय नेते आणि देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह शंभरावर विमाने रामनगरीत या दिवशी उतरतील. विमानतळ नवरीप्रमाणे सजविण्यात येत आहे. प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठादिनी विमानतळापासून अयोध्येत येणार्‍या सर्व रस्त्यांवर फुलांची सजावट केली जाणार आहे.

अयोध्येत उतरले पहिले विमान

अयोध्या विमानतळाच्या धावपट्टीवर चाचणी म्हणून शुक्रवारी पहिले विमान उतरले. नागरी विमान वाहतूक विभागाचे अधिकारी या विमानातून अयोध्येत दाखल झाले.

आता 30 डिसेंबरला 2 विमाने

आता 30 डिसेंबर रोजी दिल्लीहून सकाळी 11.20 वाजता एक विमान येथे येईल. त्यानंतर अन्य विमानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 वाजता पोहोचतील.

पंतप्रधान मोदींची सभा

विमानतळासमोर मोदींची सभा होईल. दोन लाखांवर लोक यावेळी उपस्थित असतील. यानंतर ते अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील, मग रामलल्ला आणि हनुमानगढीचे दर्शन करतील. शिवाय 3 हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची सुरुवात त्यांच्या हस्ते केली जाईल.

पालिकेची लगबग

अयोध्या नगर परिषदेने सफाई कामगारांची संख्या
3 हजारांवरून 5 हजार केली आहे.
डिजिटल टुरिस्ट मॅप विकसित करण्यात येत आहेत.
मराठी, तमिळ, तेलुगू, गुजरातीसह सर्व प्रमुख भाषांतून दिशानिर्देशकांची तजवीज.
काही रस्त्यांवर ई-रिक्शा वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

5 लाख गावांतून थेट प्रसारणाची सोय

देशातील 50 प्रमुख अक्षत केंद्रांवरून देशातील 5 लाख गावांपर्यंत रामलल्लाचे निमंत्रण गेले आहे.
22 जानेवारी रोजी या गावांतील लोक आपापल्या देवस्थानांत एकत्रित येतील आणि
प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रसारण पाहू शकतील.

5 कि.मी. लांब उड्डाणपूल

अयोध्येत 33 हजार कोटी रुपये खर्चाच्या 232 योजनांवर काम सुरू आहे. सर्वांत महत्त्वाचा प्रकल्प आहे तो अयोध्या रेल्वे स्थानक ते अयोध्या विमानतळाला जोडणारा 5 कि.मी. लांबीचा उड्डाण पूल (फ्लायओव्हर) अन्य दुसर्‍या प्रकल्पांतर्गत अयोध्येच्या चहुबाजूंनी 15 कि.मी. परिसर विकसित केला जात आहे.

1 हजार विशेष रेल्वे

रामभक्तांसाठी रेल्वेतर्फे देशभरातील विविध रेल्वे स्थानकांतून 1 हजार विशेष रेल्वे असतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT