Latest

आयपीएलवर ऑनलाईन सट्टा प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई

Shambhuraj Pachindre

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : आयपीएलवर ऑनलाईन सट्टा चालविणाऱ्या दोन जणांवर देसाईगंज पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. चेतन पुरुषोत्तम मस्के (रा.कोरेगाव, चोप) व नवीश नरड (रा.शेगाव, ता.वरोरा, जि.चंद्रपूर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून रोख रकमेसह दोन मोबाईल आणि एक चारचाकी वाहन असा एकूण १६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

देसाईगंज येथे आयपीएलवर ऑनलाईन सट्टा चालविण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विर्शी टी पॉइंटजवळ सापळा रचला. समोरुन येणाऱ्या चारचाकी वाहनाला थांबवून तपासणी केली असता त्यात दोन मोबाईल आणि ३ लाख ६६ हजार ९०० रुपये आढळून आले. वाहनचालक चेतन मस्के यास विचारणा केली असता त्याने मोबाईलद्वारे वेबसाईटचा वापर करुन आयपीएलवर सट्टा खेळत असल्याचे सांगितले.

शेगाव येथील नवीश नरड या युवकाच्या साह्याने हा सट्टा चालवत असल्याची माहितीही त्याने दिली. यावरुन पोलिसांनी चेतन मस्के व नवीश नरड यांच्यावर गुन्हे दाखल केले. शिवाय रोख रक्कम, मोबाईल आणि चारचाकी वाहन असा एकूण १६ लाख ३१ हजार ९०० रुपयांचा ऐवज जप्त केला.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, यतीश देशमुख, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अजय जगताप, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, अंमलदार विलेश ढोके,संतोष सराटे व विलास बालमवार यांनी ही कारवाई केली. पाच दिवसांपूर्वी अहेरी पोलिसांनीही आयपीएलवर सट्टा चालविणाऱ्या १० जणांवर गुनहे दाखल केले होते. यावरुन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सट्टा सुरु असल्याचे दिसून येते.

SCROLL FOR NEXT