Latest

ITI Online Admission : ‘आयटीआय’ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील (आयटीआय) 2023-24 शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबतचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. जिल्ह्यात शासकीय व खासगी आयटीआयमध्ये सुमारे 6 हजार जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

नोकरी, रोजगाराची हमी म्हणून दरवर्षी आयटीआय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो. दहावीच्या निकालानंतर सोमवारपासून ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 12 जून ते 11 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे व दुरुस्ती करता येणार आहे. 19 जून ते 11 जुलैपर्यंत प्रवेश अर्ज निश्चिती व पहिल्या प्रवेश फेरीसाठी प्राधान्यक्रम सादर करता येणार आहे.

13 जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. 13 व 14 जुलै रोजी गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविता येणार आहेत. अंतिम गुणवत्ता यादी 16 जुलै रोजी प्रसिद्ध होईल. 20 जुलै रोजी पहिली प्रवेश फेरी सुरू होणार आहे. यावर्षी चार प्रवेश फेर्‍या होणार आहेत. 26 ऑगस्ट संस्थास्तरावर समुपदेश फेरी होणार आहे.

शासकीय आयटीआयमध्ये 1,412 जागा

कोल्हापुरातील शासकीय आयटीआयमध्ये सुमारे 30 ट्रेडसाठी 1,412 जागा उपलब्ध आहेत. यात दोन वर्षे मुदतीचे फिटर, टर्नर, इलेक्ट्रेशियन, मशिनस्ट ग्राईंडर, टूल अँड डायमेकर, वायरमन, पेंटर जनरल, मॅकेनिक अ‍ॅग्रीकल्चरल मशिनरी आदी ट्रेड आहेत. एक वर्ष मुदतीच्या अभ्यासक्रमात फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, प्लास्टिक प्रोसेसिंग, फौंड्रीमन, वेल्डर, स्टील मेटल वर्कर, ट्रॅक्टर मॅकेनिक आदी ट्रेडचा समावेश आहे. तर मुलींसाठी बेसिक कॉस्मॉटोलॉजी, सुईंग टेक्नॉलॉजी हे ट्रेड आहेत, अशी माहिती प्राचार्य एम.एस. आवटे यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT