Latest

कांद्याच्या दर नियंत्रणासाठी केंद्राची कसरत

Arun Patil

कोल्हापूर : यंदाच्या मान्सूनच्या अपुर्‍या आणि अनियमित बरसण्याने सध्या देशात कांदा भडकला आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणणार्‍या कांद्याला प्रभावी मात्रा म्हणून केंद्र सरकारने शिल्लक कोट्यातून कांद्याची गोदामे खुली केली आहेत. यामुळे कांद्याच्या किमती सणासुदीच्या काळात थोड्या उतरतील, असा दिलासा असला तरी यंदाच्या दिवाळीत ग्राहकांना कांद्याचा वापर जपून करावा लागणार आहे.

देशात महाराष्ट्र आणि कर्नाटक ही कांदा उत्पादनाची प्रमुख राज्ये आहेत. अपुर्‍या पावसाने खरिपाच्या कांद्याला मोठा फटका बसला आहे. यामुळे कांद्याचे उत्पादन कमी झालेच; शिवाय कांद्याची नवी लागवडही लांबली. याचा परिणाम सध्या देशातील कांद्याच्या बाजारपेठेवर झाला आहे. 15 दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत प्रतिकिलो 30 रुपये किलो विकला जाणारा कांदा आता 80 रुपये किलोवर जाऊन पोहोचला आहे. कांद्याच्या दराचा हा वेग किलोला शंभरी गाठू शकतो, असे लक्षात आल्यानंतर केंद्राने कांद्याच्या निर्यात शुल्कात प्रथम वाढ केली. तरीही देशांतर्गत उत्पादन अपुरेच असल्यामुळे बाजारपेठेतील कांद्याचे भाव खाली येईनात. यामुळे दुसरे अस्त्र म्हणून केंद्राने अन्नधान्याच्या राखीव गोदामातून कांदा विक्रीसाठी बाहेर काढला आहे.

सध्या देशातील 16 शहरांत केंद्र सरकार कांद्याची विक्री करत आहे. कांद्याबरोबर बाजारपेठेत अन्य भाज्यांचे भाव वाढू लागले आहेत. यामुळे नियंत्रणात आलेली महागाई पुन्हा डोके वर काढते की काय, या चिंतेने सध्या केंद्रीय अन्न, वाणिज्य आणि अर्थमंत्रालयाला ग्रासले आहे. कांद्याचे हे वाढणारे भाव लक्षात घेता केंद्राने 28 ऑक्टोबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध आणले. यासाठी किमान निर्यात किंमत 800 डॉलर प्रतिटन या पातळीवर आणली. याच्या परिणामाने महाराष्ट्रातील लासलगाव या कांद्याच्या प्रमुख बाजारपेठेत कांद्याचे भाव 5 ते 9 टक्क्यांनी खाली आले आहेत.

जागतिक बाजारपेठेतही तुटवडा

भारताप्रमाणेच यंदा जागतिक बाजारपेठेतही कांद्याचा तुटवडा आहे. देशांतर्गत मागणीप्रमाणे जागतिक पातळीवरही कांद्याला मोठी मागणी आहे. परंतु, केंद्र सरकारने 800 डॉलर्स प्रतिटन हा किमान निर्यात भाव जाहीर केल्यामुळे कांदा उत्पादक या पातळीखाली कांदा जागतिक बाजारपेठेत निर्यात करू शकत नाहीत. साहजिकच, यंदा ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याने ग्राहकांना रडविले आहे, अपुर्‍या उत्पादनाने उत्पादक तोट्यात आहे आणि महागाई रोखण्यासाठी केंद्राची तारेवरची कसरत सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT