Latest

Onion Export News | ७५ रुपये दरामुळे भारतीय कांद्याकडे जगाची पाठ

गणेश सोनवणे

कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीचा फटका निवडणूकीत बसू नये यासाठी केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधील असंतोष कमी करण्यासाठी निर्यातबंदी मागे घेण्याची घोषणा केली असली तरी विविध अटी-शर्तीमुंळे कांदा निर्यातीवर अजुनही एकत्रित ९० टक्के शुल्क लागूच आहे. या भरमसाठ शुल्कामुळे भारतीय कांदा विदेशी बाजारपेठेत ७० ते ७५ रुपये प्रति किलो दराने दाखल होत असल्याने विदेशी व्यापाऱ्यांनी भारतीय कांद्याकडे पाठ फिरवली आहे. यंदाच्या वर्षात १२० अब्ज रुपयांच्या विदेशी चलनावर सरकारने पाणी फेरले आहे. (Onion Export News )

केंद्र सरकारने निर्यातबंदी हटविल्याची घोषणा केली. परंतु कांद्याच्या निर्यातीसाठी प्रति टन ५५० डॉलर किमान निर्यात मूल्य व ४० टक्के निर्यात शुल्क कायम ठेवलेले आहे. जीवनावश्यक वस्तू असलेला कांदा प्रचंड निर्यातशुल्क असलेली एकमेव खाद्य वस्तू ठरली आहे. तब्बल पाच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतरही कांदा निर्यातबंदी या-ना त्या अटीच्या रुपात टिकूनच आहे. किमान निर्यात मूल्य व निर्यात शुल्कामुळे भारतीय कांदा निर्यात करताना त्याचे शुल्क ६४ रुपये प्रति किलोपर्यंत जात आहे. निर्यातीचा खर्च पाहता संबंधित देशात भारतीय कांदा पोहचताना त्याची किंमत ७० ते ७५ रुपये प्रति किलोपर्यंत होत आहे. युरोपात तर भारतीय कांद्याची किंमत १०० रुपयांपर्यंत जाते. संबंधित देशात ३० रुपये ते ५० रुपये प्रति किलोप्रमाणे नेदरलॅण्डचा कांदा उपलब्ध असल्यामुळे ७० ते ७५ रुपये प्रतिकिलो किंमतीचा भारतीय कांदा तेथे कुणीच घेणार नाही, अशी खंत निर्यातदार व्यापाऱ्यांनी स्पष्ट केली. (Onion Export News )

भारतातून २०२२-२३ या आर्थिक वर्षात २५ लाख मेट्रीक टन कांद्याची निर्यात केलेली आहे. भारत चीननंतर जगातील सर्वात मोठा कांदा उत्पादक देश असून जगातील १५ टक्के कांदा भारत पिकवितो. २०१८ ते २०२३ या सहा वर्षात कांद्याने तब्बल नऊ अब्ज डॉलर म्हणजेच ७२० अब्ज रुपयांचे विदेशी चलन भारताला मिळवून दिले. भारतातून दरवर्षी कांद्याची निर्यात ३.१४ टक्क्यांनी वाढत आहे. परंतु २०२४ ला कांदा निर्यातीला सरकारने पूर्णपणे ब्रेक दिला आहे. २०२३-२४ मध्ये भारत कांदा निर्यातीत जगात नंबर वन होता. (Onion Export News )

गत पाच वर्षातील निर्यात 

२०१८: १.४ अब्ज डॉलर

२०१९: १.२ अब्ज डॉलर

२०२०: १.८ अब्ज डॉलर

२०२१: १.६ अब्ज डॉलर

२०२२: १.३ अब्ज डॉलर

२०२३: १.७ अब्ज डॉलर

भारतातून २०२३-२४ मध्ये झालेली निर्यात (Onion Export News )

-एकूण निर्यात : आठ लाख १९ हजार ७७४ शिपमेंटस्

-एकूण निर्यातदार कंपन्या : १४,००४

-एकूण खरेदीदार कंपन्या: ३१,०७५

-प्रमुख आयातदार देश: श्रीलंका, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती

आखात नाशिकच्या कांद्याची हक्काची बाजारपेठ

भारतीय कांद्याला आखातात प्रचंड मागणी आहे. परंतु गत डिसेंबरपासून तेथे भारतीय कांदा पोहचू शकलेला नाही. तेथे सध्या इजिप्त, पाकिस्तान, तुर्कस्तान, चीन आणि मोरोक्कोसह काही आफ्रिकन देशांतील कांदा निर्यात होत आहे. परिणामी भारतीय कांद्याने यंदा मोठी बाजारपेठ गमावली आहे. तेथे गडद लाल, फिकट लाल, पांढरा, रोझ, पुसा रत्नार, पुसा लाल, पुसा पांढरा गोल या जातींना प्रचंड मागणी आहे. आखाती देशातील बिर्याणी आणि अन्य मांसाहारी पदार्थ भारतीय कांद्याच्या पेस्टशिवाय बनतच नाही, अशी स्थिती आहे.

बांगलादेशने उभारले कांदा स्टोरेज प्रकल्प

श्रीलंकेने तर इजिप्तमधून कांदा आयात केला. बांगलादेशने कांदा टचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरुपी कांदा प्रक्रिया आणि साठवणूक केंद्राचा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तेथील जायंट ॲग्रो प्रोसेसिंग कंपनीने डच कंपनीच्या सहाय्याने ४०० टन कांदा साठवणूकीचा प्रकल्प उभा केला जाणार आहे. बांगलादेशात तीस टक्के कांदा पीक साठवणूक सुविधा नसल्याने वाया जातो. हे प्रमाण पाच टक्क्यांवर आणण्याचे बांगलादेशचे उद्दीष्ट आहे. भारताच्या निर्णातबंदीमुळे आजाबाजूच्या देशात कांद्यात अशी क्रांती होत आहे आणि बाजारपेठही निघून चालली आहे.

भारतीय कांद्याचे प्रमुख ग्राहक देश

बांगलादेश ३०.२६ टक्के

मलेशिया १८.४८ टक्के

युएई १३.२४ टक्के

श्रीलंका १२.५५ टक्के

नेपाळ ६.६ टक्के

इंडोनेशिया ४.५१ टक्के

सौदी अरेबिया ४.०२ टक्के

कतार ३.७४ टक्के

कुवेत ३.३५ टक्के

ओमन ३.२५ टक्के

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT