Latest

Mumbai News : सहा ‘दिवसांत ५५ कोटींची कांदाविक्रीची उलाढाल ठप्प

दिनेश चोरगे

नवी मुंबई :  नाशिक जिल्ह्यातील सतरा बाजार समितीत कांदा लिलाव व्यापा-यांनी गेल्या आठवड्यापासून बंद केल्याने सुमारे ५५ कोटींची कांदा विक्रीची उलाढाल ठप्प झाली आहे. तर जिल्ह्यातील शेतक-यांनी चाळीत सोडवणूक केलेला २५ हजार क्विटल कांदा चाळीत सडला. यामुळे शेतक-यांना दुहेरी नुकसानीचा फटका बसला आहे.

गेल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यातील १७ बाजार समितीत कांदा लिलाव व्यापा-यांनी बंद ठेवला आहे. ४० टक्के निर्यात शुल्क तातडीने रद्द करण्याची मूळ मागणी व्यापा-यांनी केली आहे. या मागणीसाठी थेट कांदा लिलाव बंद ठेवत राज्य सरकारला धारेवर धरत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनेने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील सतरा बाजार समितीत एका दिवसात सुमारे एक लाख क्विंटलहून अधिक कांद्याचे होणारे लिलाव बंद झाल्याने हा कांदा शेतक-यांच्या चाळीत तसाच पडून आहे. यामुळे व्यापारी, शेतकरी यांची उलाढाल ठप्प झाली आहे.

हे लिलाव सुरू करण्यासाठी आज सोमवारी सकाळी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने लासलगाव बाजार समितीला पत्र दिले. परराज्यात नाशिक जिल्ह्यातुन कांद्याची होणारी विक्री ही बंद पडली. एकाही चाळीतून परराज्यात कांदा पाठवला नाही. यामुळे कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण करून राज्य सरकारला वटणीवर आणण्याचा विढा व्यापारी संघटनेने घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातून दररोज किमान १५० ते २०० ट्रक कांदा हा परराज्यात जातो. रेल्वेचे रॅक लागले नाही. ट्रॅक्टर घरी, शेतात उभे करून ठेवल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. राज्य सरकार ठोस भूमिका घेत नाही. तोपर्यंत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने अक्षरशः बाजार समित्या ओस पडल्या आहेत. याबाबत उद्या २६ सप्टेंबर रोजी पणन मंत्र्यांच्या दालनात बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत निर्णय झाला नाही तर लिलाव असेच बंद राहतील की सुरू होणार हे बैठकीतील चर्चा आणि निर्णयावर अवलंबून आहे.

निर्यात शुल्क शून्य करण्याची मागणी

  •  लासलगाव बाजार समितीत महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने सोमवारी बैठक घेतली. यावेळी तत्काळ निर्यात शुल्क शून्य केलं नाही तर दिल्लीत केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल, कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या भेटी घेऊन निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती भारत दिघोळ यांनी दिली.

किरकोळचे दर जैसे थे

किरकोळ बाजारात कांदा ३० ते ३५ रूपये किलोने विकला जात आहे. हाच कांदा एपीएमसी बाजारात ११ ते १५ आणि १६ ते १८ रुपये दराने खरेदी करून किरकोळ व्यापारी ग्राहकांना विक्री करत आहेत. किरकोळ बाजारावर ही कुठलाही परिणाम दिसून येत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT