Latest

पुणे: बर्जर पेंट कंपनीत बॉयलरच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू, कंपनी गेटसमोर मृतदेह ठेवून कामगारांचे आंदोलन

अमृता चौगुले

जेजुरी, पुढारी वृत्तसेवा: जेजुरी एमआयडीसीमधील बर्जर पेंट इंडिया लिमिटेड या कंपनीत शुक्रवारी (दि. 30) रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास बॉयलरचा स्फोट होऊन त्यात एका तरुण कामगाराचा मृत्यू झाला. या कामगाराला न्याय मिळावा यासाठी कंपनीतील कामगारांनी त्याचा मृतदेह कंपनीच्या गेटसमोर आणून आंदोलन केले. कंपनी व्यवस्थापनाने मृत कामगार कुटुंबियांना आर्थिक सहाय्य करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह नेण्यात आला. रोहित जयवंत माने (वय 28, रा. राख, ता. पुरंदर) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, जेजुरी एमआयडीसीमध्ये बर्जर पेंट ही कंपनी आहे. शुक्रवारी (दि. ३०) रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास कंपनीत बॉयलारचा स्फोट झाला. या स्फोटात रोहित माने हा तरुण कामगार होरपळून गंभीर जखमी झाला. त्याला ससून रुग्णालयात रात्री उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला.

ससून रुग्णालयातून या तरुणाचा मृतदेह सुमारे २०० कामगारांनी शववाहिनीतून बर्जर पेंट कंपनीच्या गेटसमोर आणून मृत कामगारांच्या नातेवाईकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी ठिय्या आंदोलन केले. यावेळी कंपनीतील कामगार, शिवसेनेचे विठ्ठल सोनवणे, अतुल म्हस्के, मनसेचे उमेश जगताप, काँग्रेसचे हेमंत सोनवणे, भाजपचे गणेश भोसले यांनी मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या आई व वडिलांना एक कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य तसेच मृत कामगारांच्या नातेवाईकाला कंपनीत कायम स्वरुपी नोकरी मिळावी, अशी मागणी केली. यावेळी कामगार संतप्त झाले होते. तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. जेजुरीचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर, पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे यांनी कायदा व सुव्यवस्था ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

अखेर कंपनी व्यवस्थापनाने मृत कामगारांच्या आई व वडिलांना एक कोटी रुपये व नातेवाईकांस कायम नोकरी तसेच कंपनीत कामगारांसाठी सुरक्षा व्यवस्था देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर मृत कामगारांचे नातेवाईक व कंपनीतील कामगारांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी राख या गावी नेला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT