Latest

One Nation One Election : लोकसभेसोबतच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी

Arun Patil

मुंबई, चंदन शिरवाळे : भारतीय जनता पक्षाला देशात सध्या असलेले अनुकूल वातावरण आणि 'वन नेशन-वन इलेक्शन'चा प्रयोग म्हणून लोकसभा निवडणुकीसोबतच महाराष्ट्र आणि इतर नऊ राज्यांच्या निवडणुका घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे.

देशात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे चक्र सतत सुरूच असते. प्रत्येक निवडणुकीवर कोट्यवधी रुपये होणारा खर्च, प्रशासनावर पडणारा ताण, शिक्षकांवर जबाबदारी सोपविली जात असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान व संरक्षण यंत्रणा मोठ्या प्रमाणात व्यस्त होत असल्याने देशात 'वन नेशन-वन इलेक्शन'नुसार एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी सूचना केल्या आहेत. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरू केल्याची माहिती राज्य निवडणूक कार्यालयातील अधिकार्‍याने दै. 'पुढारी'ला दिली.

कर्नाटक, मध्य प्रदेश, त्रिपुरा या तीन राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. राजस्थान व छत्तीसगडमध्ये काँग्रेस, मेघालय, मिझोराममध्ये मिजो नॅशनल फ्रंट, नागालँडमध्ये आघाडी सरकार, तर तेलंगणामध्ये टीआरएस सत्तेत आहे. या सर्व राज्यांची विधानसभेची मुदत 2023 मध्ये वेगवेगळ्या महिन्यांमध्ये संपते.

पुढील वर्षी म्हणजे, मार्च 2024 मध्ये लोकसभेची मुदत संपते. या निवडणुकीची प्रक्रिया फेब्रुवारी 2024 पासून सुरू होईल, तर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सप्टेंबर 2024 मध्ये आहे. या निवडणुकीची प्रक्रिया जुलै किंवा ऑगस्टपासून सुरू होईल. एकामागोमाग नऊ राज्यांच्या घ्याव्या लागणार्‍या निवडणुका आणि पाठोपाठ लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक येत असल्यामुळे 'वन नेशन-वन इलेक्शन'चा प्रयोग राबविण्याबाबत भाजप सकारात्मक आहे. त्याद़ृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगसुद्धा पावले उचलत असल्याचे या अधिकार्‍याने सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT