Latest

आता ‘एक्स्प्रेस वे’वर जा सुसाट; कारला समतल भागात 100 ची वेगमर्यादा

अनुराधा कोरवी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी महामार्ग पोलिसांकडून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यात कारला समतल भागात 100 तर घाट परिसरात 60 वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

ही वेगमर्यादा पूर्वीपेक्षा अधिक असल्याने वाहने आता वेगाने धावणार आहेत. या मर्यादेचे उल्लंघन केल्यास वाहनचालकांवर सीसीटीव्ही आणि स्पीडगनच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

पुणे-मुंबई-पुणे अंतर कमी करण्यासाठी या एक्स्प्रेस वेची म्हणजेच यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाची निर्मिती करण्यात आली. मात्र या मार्गावर गेल्या काही वर्षांत प्रचंड अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. हे रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून गेल्या काही वर्षांपासून ठोस पावले उचलली जात आहेत. आता वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) सुखविंदर सिंग यांनी दिलेल्या आदेशानुसार आता पुणे-मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वेग मर्यादेची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

म्हणून वेगमर्यादा केली निश्चित

पुणे-मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा एकूण 94 किलोमीटरचा असून या महामार्गावर 35 ते 52 कि.मी. या टप्प्यामध्ये घाटभाग म्हणजेच बोर घाट आहे. सद्य:स्थितीत या द्रुतगती महामार्गावरील समतल भागासाठी असलेली वेगमर्यादा 100 किलोमीटर प्रतितास असून घाटभागामध्ये आल्यानंतर वेगमर्यादा 50 कि.मी. प्रतितास आहे.

मात्र घाटभागातील ही वेगमर्यादा हलक्या वाहनांसाठी अत्यंत कमी असून पुणे ते मुंबई वाहिनीवर अतितीव्र उतार आहे. समतल भागातून 100 किलोमीटर प्रतितास याप्रमाणे प्रवास केल्यानंतर घाटभागात आल्यावर वाहनाची वेगमर्यादा 50 कि.मी.वर आणताना वाहन चालकांना अडचणी निर्माण होतात.

तसेच वाहन चालकाने वाहनांचा वेग जलदगतीने कमी केल्याने अनेक अपघात घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाहनांच्या वर्गानुरूप वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

अशी असणार वेगमर्यादा…

प्रवासी मोटार वाहने, 8 प्रवासी वाहणारी : 100 किमी/प्रतितास : 60 किमी/प्रतितास
प्रवासी वाहने, 9 पेक्षा अधिक प्रवासी वाहणारी : 80 किमी/प्रतितास : 40 किमी/प्रतितास
मालवाहतुकीची वाहने : 80 किमी/प्रतितास : 40 किमी/प्रतितास

SCROLL FOR NEXT