Latest

‘व्हॅलेंटाईन’च्या पूर्वसंध्येला वाद मिटला; पुन्हा वैवाहिक जीवन सुरू; एकमेकांना पुष्पहार घालून घेतली शपथ

मोहन कारंडे

निपाणी : पुढारी वृत्तसेवा : 'त्या' दोघांनी आई-वडिलांच्या संमतीने रितसर विवाह केला होता. परंतु नंतर त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाले आणि हे प्रकरण निपाणी न्यायालयात घटस्फोटापर्यंत गेले. येथील दोन्ही बाजूच्या वकिलांनी समुपदेशन करून या दाम्पत्याला पुन्हा एकत्र आणले. व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेत पुन्हा एकदा नव्याने संसार सुरू करण्याची ग्वाही दिली. महालोक अदालतीमध्ये एकमेकांच्या गळ्यात हार घालून त्यांनी शपथ घेतली.

संतोष पाटील (रा. पांगीरे (बी) व सोनाली पाटील (रा. रासाई शेंडूर, ता. निपाणी) यांचा 2011 साली विवाह झाला होता. त्यांना दोन अपत्ये असून गेल्या वर्षभरापासून ते दोघे विभक्त होते. दरम्यान, त्यांनी एकमेकांतील वाद मिटवित पुन्हा एकदा वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. येथील न्यायालयात झालेल्या महालोकअदालतीमध्ये वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश प्रेमा पवार यांच्या न्यायालयात असलेल्या या दाव्यामध्ये दोघांनाही समजावून सांगून व मुलांच्या भवितव्याचा विचार करून एकत्र येण्याचे आवाहन केले गेले. त्याला दोघांनी प्रतिसाद देत आपसातील वाद मिटवून पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांनी न्यायालयासमोर एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घालून लग्नबंधन कायम ठेवण्याची ग्वाही दिली. शिवाय एकत्रित नांदण्यासाठी शपथ घेतली.

यासाठी अ‍ॅड. सुषमा बेंद्रे यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी न्यायाधीश प्रेमा पवार, न्यायाधीश गिरीष चटणी, न्यायाधीश रंजिता, वकील संघाचे अध्यक्ष आर. एम. पाटील, सचिव एम. ए. सनदी, अ‍ॅड. झेबा इनामदार, अ‍ॅड. प्रियंका, अ‍ॅड. विनोद जनवाडे, अ‍ॅड. आर. ए. बन्ने, अ‍ॅड. राहुल वराळे आदी उपस्थित होते.

पती-पत्नीमधील वाद ही सामाजिक समस्या बनत चालली आहे. काही अंशी एकमेकांमध्ये असणारा इगोदेखील कारणीभूत आहे. परंतु भविष्यातील समस्या आणि मुलांवरचा परिणाम विचारात घेता अशा घटना समुपदेशाने टाळता येऊ शकतात, हेच या उदाहरणावरून स्पष्ट होते.
-अ‍ॅड. सुषमा बेंद्रे, निपाणी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT