Latest

Omicron Variant : पुण्याच्या ‘एनआयव्ही’त ओमायक्रॉनवर संशोधन सुरू

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron Variant) या प्रतिरूपाने बाधित रुग्णांची संख्या 25 पर्यंत पोहोचल्याने या विषाणूची ओळख पटविण्याबरोबरच त्याला नष्ट करण्याच्या प्रयत्नांना भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेमध्ये सुरुवात झाली आहे. या संस्थेच्या अधिपत्याखाली पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संशोधन संस्थेमध्ये त्याचे काम प्रगतीपथावर आहे. किमान एक आठवडा त्याच्या निष्कर्षापर्यंत येण्यासाठी लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ओमायक्रॉन या नव्या विषाणू रूपाचे हातपाय पसरू नये यासाठी त्याचे अलगीकरण आणि प्रयोगशाळेतील वाढ या दोन बाबी आवश्यक आहेत. त्याद‍ृष्टीने या विषाणूचा स्ट्रेन अलग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तो अलग झाल्यानंतर अत्यंत अत्याधुनिक अशा प्रयोगशाळेमध्ये त्याची वाढ केली जाईल. (Omicron Variant)

त्यानंतर कोरोनावरील सध्या प्रचलित असलेल्या कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड या दोन लसींमुळे निर्माण होणारी प्रतिपिंडे त्यावर किती परिणामकारक ठरतात, हे तपासून पाहिले जाईल. यानंतर भारतातील लसीकरण ओमायक्रॉनच्या मुसक्या बांधते, की त्याला पसरण्यासाठी मुभा देते, हे स्पष्ट होईल.

ओमायक्रॉन या विषाणू रूपाने संपूर्ण जगभरात चिंतेचे सावट पसरले आहे. कोरोनाच्या डेल्टा या प्रतिरूपाला लगाम घालण्यासाठी आपली परिणामकारकता सिद्ध केल्यानंतर जगभरात लसीकरणाने वेग घेतला होता. भारतासारख्या अवाढव्य लोकसंख्या असलेल्या देशामध्येही 50 टक्के नागरिकांचे संपूर्ण लसीकरण पूर्ण झाले, तर अमेरिका व युरोपातील अनेक देशांमध्ये लसीकरणाचा 50 टक्क्यांचा टप्पाही पुढे गेला आहे.

या वाढत्या लसीकरणाने सामूहिक प्रतिकारशक्‍ती निर्माण होऊन कोरोनाला हद्दपार करता येईल, असे वातावरण निर्माण झाले असतानाच कोरोनाच्या विषाणूने आपले रूप बदलले. ओमायक्रॉन असे नामकरण करीत त्याने चिंता निर्माण केल्याने पुन्हा एकदा जगभरातील प्रयोगशाळांमधील लगबग वाढली आहे. (Omicron Variant)

ओमायक्रॉन या नव्या प्रतिरूपाने शास्त्रज्ञांपुढे दोन प्रमुख प्रश्‍न निर्माण केले आहेत. विषाणूचे हे प्रतिरूप सध्या वापरात असलेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींना दाद देते का आणि कोरोना संसर्गामुळे ज्यांच्या शरीरात प्रतिकारशक्‍ती निर्माण झाली आहे, ती प्रतिकारशक्‍ती भेदण्यास ओमायक्रॉन किती परिणामकारक ठरतोे या दोन प्रश्‍नांच्या उत्तराचा वेध घेण्याचे काम सध्या भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेमार्फत सुरू आहे.

* पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संशोधन संस्थेमध्ये (एनआयव्ही) कल्याण-डोंबिवली येथील ओमायक्रॉनबाधित रुग्णाच्या रक्‍ताच्या नमुन्याच्या आधारे ओमायक्रॉन विषाणूचे अलगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विषाणू रूपाचे संपूर्ण अलगीकरण केल्यानंतर त्याची प्रयोगशाळेत वाढ करून त्यावर पुढील तपासण्या सुरू होतील. डोंबिवलीतील हा रुग्ण 33 वर्षांचा असून तो दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT