Latest

Omicron Variant : मुंबईतील सर्व 237 नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोविड-19 विषाणूच्या जनुकीय क्रमनिर्धारण 10 व्या फेरीत 376 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी मुंबईतील सर्व 237 नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन विषाणू (Omicron Variant) असल्याचे आढळले आहे.

ऑगस्ट 2021 पासून नियमितपणे जनुकीय क्रमनिर्धारण चाचणी करण्यात येत आहे. दहाव्या फेरीत 0 ते 18 वयोगटातील 25 नमुने, 0 ते 5 वयोगटातील 4 नमुने, 6 ते 12 वयोगटातील 9 नमुने आणि 13 ते 18 वयोगटातील 12 नमुने होते.

हे सर्व 237 नमुने ओमायक्रॉनबाधित (Omicron Variant) असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, या सर्वांना कोरोनाबाधा झाल्याची गंभीर लक्षणे नव्हती, असे आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.

नमुने घेतलेल्या 237 पैकी 6 जणांनी लसीची केवळ पहिली मात्रा घेतली होती. त्यापैकी एका रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागले. दोन्ही लसमात्रा घेतलेल्या 128 रुग्णांपैकी 7 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यापैकी एका रुग्णाला प्राणवायूची गरज भासली, तर एका रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवावे लागले.

एकूण 103 रुग्णांनी लसीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. त्यापैकी 18 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले, तर दोन रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली. त्याचप्रमाणे एका रुग्णास अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले.

SCROLL FOR NEXT