Latest

Odisha triple train crash | ओडिशा रेल्वे दुर्घटना! बचावकार्य पूर्ण, घटनेची सखोल चौकशी सुरु : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तिहेरी रेल्वे अपघातानंतरचे बचावकार्य पूर्ण झाले आहे. आम्ही या घटनेची सखोल चौकशी करू आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेऊ, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ओडिशातील भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २६१ वर पोहोचली असून घटनास्थळी बचावकार्य पूर्ण झाले आहे, अशी माहितीही दक्षिण पूर्व रेल्वेच्या अधिकाऱ्याने शनिवारी दिली. (Odisha triple train crash)

मृतांचा आकडा २८८ वर गेल्याचे वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिले आहे. पण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी २६१ लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. "ओडिशातील रेल्वे अपघाताच्या ठिकाणी वैद्यकीय मदतीसाठी भुवनेश्वरमधील एम्स डॉक्टरांच्या दोन टीम बालासोर आणि कटकसाठी रवाना करण्यात आल्या आहेत," असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत सांगितले आहे.

दरम्यान, बालासोर रेल्वे दुर्घटनेसंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक झाली. तसेच आज पंतप्रधान मोदी आज ओडिशा जाऊन घटनास्थळी भेट देणार आहेत.

कोलकात्यापासून दक्षिणेस सुमारे २५० किमी आणि भुवनेश्वरपासून उत्तरेस १७० किमी अंतरावर बालासोर जिल्ह्यातील बहनागा बाजार स्टेशनजवळ शुक्रवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास हा भीषण रेल्वे अपघात झाला. (Odisha triple train crash)

रेल्वे अपघाताची चौकशी दक्षिण पूर्व सर्कलचे रेल्वे सुरक्षा आयुक्त ए एम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली केली जाईल, असे भारतीय रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे. १२८६४ बंगळूर-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे अनेक डबे हावडा मार्गावर रुळावरून घसरले आणि लगतच्या रुळांवर पडले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. "हे रुळावरून घसरलेले डबे १२८४१ शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकले आणि तिचे डबेही उलटले," असेही सांगण्यात आले आहे.

या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना १० लाख, गंभीर जखमींना २ लाख आणि किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे. (coromandel express train accident)

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT