Latest

Odisha Train Accident : एका मृतदेहासाठी अनेकांचा दावा! प्रियजनांच्या ओळखीसाठी डीएनए चाचणीचा आधार

रणजित गायकवाड

भुवनेश्वर, पुढारी ऑनलाईन : Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातातील 275 बळींपैकी जवळपास 100 जणांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे कुटुंबीयांच्या दु:खात भर पडली आहे. बेपत्ता प्रियजनांच्या शोधात नातेवाईक रुग्णालयाच्या शवागारापासून स्थानकापर्यंत चकरा मारत आहेत. शेकडो मृतदेहांपैकी कोणाचे धड, कोणाचा हात तर कोणाचा पाय गायब आहे. शरीराचे काही अवयव असे आहेत की अनेक जण त्यावर दावा करत आहेत. अशा परिस्थितीत मृतदेह कोणाच्या ताब्यात द्यायचा? यात राज्य सरकार गोंधळलेले आहे. त्यामुळे आता आता डीएनए चाचणी द्वारे मृतदेहांची ओळख पटवणे हाच शेवटचा पर्याय शिल्लक असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

काही कुटुंबीयांनी दावा केला आहे की, त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह दुसऱ्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत. त्याचवेळी काही नातेवाईक दररोज शवागारात येत आहेत. दरम्यान, डीएनए चाचणीचा अहवाल आल्यानंतरच मृतदेह ताब्यात देण्यात येतील, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (Odisha Train Accident)

एका मृतदेहावर अनेक कुटुंबांकडून दावा (Odisha Train Accident)

भुवनेश्वर महानगरपालिकेचे आयुक्त विजय अमृता कुलंगे यांनी सांगितले की, रक्ताचे नाते नसलेले काही नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी येत असल्याने मृतदेह ताब्यात देण्यास विलंब होत आहे. याची खात्री करण्यासाठी डीएनए चाचणी आवश्यक आहे, त्यामुळे प्रक्रिया पारदर्शक होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तथापि, प्रियजनांचे मृतदेह दुसऱ्या कोणाला देण्यात आल्याचे म्हणणाऱ्या कुटुंबीयांच्या दाव्याला पुष्टी देण्यास आयुक्तांनी नकार दिला आहे.

16 वर्षाच्या मुलाचा मृतदेह शोधण्याचा आईचा प्रयत्न

भुवनेश्वरमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये एक आई तिच्या 16 वर्षाच्या मुलाचा मृतदेश शोधत आहे. पण आपल्या मुलाच्या मृतदेहाची ओळख पटली असून रुग्णालयाने मृतदेह आधीच कोणालातरी सुपूर्द केला असल्याचे तिने म्हटले आहे.

दुसर्‍याच एका महिलेचा काकाच्या मृतदेहावर दावा

पश्चिम बंगालमधील रहिवासी असलेल्या झकेरिया लस्कर यांनी देखील त्यांचे काका अबू बकर लस्कर यांच्या मृतदेहावर मालदा येथील एका महिलेने दावा केल्याचे म्हटले आहे. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिल्याचे झकेरिया लस्कर यांनी सांगितले.

अनेकांसाठी कधीही न संपणारी प्रतीक्षा

अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या इतर काही कुटुंबांसाठी ही कधीही न संपणारी प्रतीक्षा आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा येथील गोराचंद बॅनर्जी आपला मुलगा सुभाषीष बॅनर्जी यांचा मृतदेह घेण्यासाठी सोमवारपासून एम्सच्या शवागारात फेऱ्या मारत आहेत. डीएनए चाचणीचा अहवाल आल्यानंतरच मृतदेह ताब्यात दिला जाईल, असे त्यांना सांगण्यात आले आहे.

तीन ट्रेनच्या अपघातात 288 जणांचा मृत्यू (Odisha Train Accident)

2 जून रोजी संध्याकाळी 7 वाजल्यानंतर झालेल्या तीन ट्रेनच्या धडकेत 288 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 1175 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी 793 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून 10 लाख रुपयांची मदत दिली जात आहे. मृतदेहाची ओळख पटताच 9.5 लाख रुपयांचा धनादेश तर 50 हजार रुपये रोख देण्यात येत आहेत.

SCROLL FOR NEXT