Latest

ODI WC 2023 : एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर; अहमदाबादमध्ये होणार अंतिम सामना

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात आयोजित करण्यात येणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकते. तर अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाऊ शकतो. २०११ च्या विश्वचषकाचे विजेतेपद भारताने जिंकले होते. २०२३ च्या विश्वचषकावर नाव कोरणे हे टीम इंडियाचे लक्ष्य आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या स्पर्धेसाठी सुमारे १२ शहरांची निवड केली आहे. यामध्ये मुंबई, चेन्नई, दिल्ली, धर्मशाला, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, बंगळूर,, लखनौ, इंदूर, राजकोट या शहरांचा समावेश आहे. या स्पर्धेत ४६ दिवस एकूण ४८ सामने होतील. 'बीसीसीआय'ने अद्याप सामन्यांसाठी कोणतेही विशिष्ट ठिकाण किंवा सराव सामन्यांसाठी शहरे निश्चित केलेली नाहीत.

'आयसीसी' वर्ल्डकपचे वेळापत्रक किमान एक वर्ष अगोदर जाहीर करते. 'बीसीसीआय' देखील भारत सरकारच्या आवश्यक मंजुरीची वाट पाहत आहे. यामध्ये पाकिस्तान संघाला कर सूट आणि व्हिसा मंजुरी मिळणे गरजेचे आहे. भारत आणि पाकिस्तानने २०१२-१३ पासून द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. दुबईत गेल्या आठवड्यात 'आयसीसी'ची त्रैमासिक बैठक झाली. या बैठकीत बीसीसीआयने पाकिस्तान संघाचा व्हिसा भारत सरकारकडून मंजूर केला जाईल, असे आयसीसीला आश्वासन दिले होते. कर सवलतीच्या मुद्द्यावर, बीसीसीआय लवकरात लवकर सरकारच्या भूमिकेबद्दल आयसीसीला अपडेट देण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT