जोहान्सबर्ग, वृत्तसंस्था : टीम साऊदीच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने दुसर्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेटस्नी पराभव करून इतिहास रचला. या मालिकेत पाहुण्यांचा 2-0 असा पराभव करून न्यूझीलंडने 92 वर्षांत 18 प्रयत्नांनंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका विजयाची नोंद केली आहे. न्यूझीलंडच्या विजयाचे नायक केन विल्यमसन आणि विल्यम ओ'रुर्के ठरले. विल्यम ओ'रुर्केने दोन्ही डावांत एकूण 9 विकेटस् घेतल्या, तर विल्यमसनने दुसर्या डावात 133 धावांची नाबाद खेळी केली. या मालिका विजयानंतर न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये आपले अव्वल स्थान मजबूत केले आहे. परिणामी, भारतीय संघ तिसर्या स्थानावर घसरला आहे. (NZ vs SA)
हॅमिल्टन येथील सेडन पार्कवर खेळल्या गेलेल्या दुसर्या कसोटीत न्यूझीलंडसमोर विजयासाठी 267 धावांचे लक्ष्य होते. याआधी किवी संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदाही 200 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला नव्हता; पण यावेळी किवींनी इतिहासाची पुनरावृत्ती होऊ दिली नाही आणि विल्यमसनचे शतक, तसेच विल यंगच्या अर्धशतकाच्या जोरावर त्यांनी विजयाचे लक्ष्य 7 गडी राखून पार केले. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 152 धावांची नाबाद भागीदारी झाली. 250 हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा हा चौथा विजय ठरला. किवीने यापूर्वी एकदा बांगलादेशविरुद्ध आणि दोनदा पाकिस्तानविरुद्ध अशी कामगिरी केली आहे. (NZ vs SA)
या सामन्याच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने 242 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 211 धावांवर गडगडला. 31 धावांची आघाडी घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसर्या डावात 235 धावा केल्या आणि त्यामुळे किवी संघाला 267 धावांचे लक्ष्य मिळाले. या सामन्यात विल्यम ओ'रुर्केने न्यूझीलंडकडून पदार्पणाच्या पहिल्या डावात 4 आणि दुसर्या डावात 5 बळी घेतले.