Latest

स्वतःची पर्वा न करता भूकंपावेळी वाचवले नवजात बाळांना!

Arun Patil

तैपेई : रुग्णालयांमध्ये डॉक्टर, नर्सेस किंवा अन्य वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सेवाभावामुळे रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत होत असते. केवळ औषधोपचारावेळीच त्यांची सेवा मर्यादित असते, असे नाही. अचानक आलेल्या आपत्तींवेळीही त्यांची अशी सेवा अनेकांना जीवदान देत असते. त्याची प्रचिती नुकतीच तैवानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपावेळी दिसली. तैवानच्या भूकंपाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एका रुग्णालयातील हा व्हिडीओ आहे. तैवानच्या भूकंपानंतर रुग्णालयातील नर्सेस म्हणजेच परिचारिका स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नवजात बाळांना वाचवण्याची धडपड करताना दिसत आहेत. नवजात बालकांच्या सुरक्षेसाठी लगेचच पुढे येणार्‍या या नर्सच्या टीमचे कौतुक होताना दिसत आहे.

तैवानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर आपल्या प्राणांची चिंता न करता एका नर्सच्या टीमने लगेचच सक्रिय होत नवजात बालकांच्या प्राणांचे रक्षण केले. भूकंपानंतर जमिनीचा हादरा बसल्यानंतर नर्सेस बाळांचे पाळणे मधोमध आणून ठेवत आहेत. तसंच, काही जणी हे पाळणे घट्ट पकडून ठेवतात. भूकंपाच्या धक्क्याने हे पाळणे उलटून बालके खाली पडू नयेत, पाळणे जास्त हलू नयेत, यासाठी त्यांची ही जीवापाड धडपड सुरू होती. जवळपास 10 नवजात बाळांना या परिचारिकांनी सांभाळले आहे.

हसिनचू येथील पोस्टमार्टम केअर होमनेदेखील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात दिसत आहे की, नर्सेस नवजात बालकांच्या रक्षणासाठी प्रसंगावधान राखून महत्त्वाची पाऊलं उचलताना दिसत आहेत. व्हिडीओत भूकंपादरम्यान होणार्‍या सर्व गरजेच्या सुरक्षित उपायांबाबतही सांगण्यात आले आहे. केअर होमने म्हटलं आहे की, भूकंप आल्यानंतर सर्व परिचारिकांनी नवजात बाळांच्या पाळण्यांना खिडकी आणि कपाटापासून दूर न्यायचे असते. तसंच, पाळणे जास्त हलण्यापासून रोखायचे होते. दरम्यान, बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पूर्वेकडील किनारी भागात 7.4 तीव्रतेचा भूकंप आला होता. या विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1 हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT