कोल्हापूर : राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्षाचे प्रवेश वाढविण्यासाठी बारावी विद्यार्थांसाठी 'स्कूल कनेक्ट' अभियान राबविले जाणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतील पुढचे पाऊल म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे सोमवारपासून राज्यभर उपक्रमाची सुरुवात होणार आहे.
उच्च शिक्षण विभागाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. विद्यापीठ, महाविद्यालयात पदवी प्रथम वर्षास प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या 20 टक्के घटली आहे. महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा खूप कमी प्रवेश झाल्याने अडचणीचे ठरत आहे. उच्च शिक्षण विभागाकडून ग्रॉस एन—ोलमेंट रेशो (जीईआर) वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पदवी प्रथम वर्षाला विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी विद्यापीठांकडून 12 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 15 ते 31 जानेवारी दरम्यान हे संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणातील विद्यार्थिकेंद्री बदल, विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन, बहुविद्याशाखीय लवचीक अभ्यासक्रमांविषयी माहिती, व्यावसायिक आणि कौशल्याधारित संबोधनाविषयी माहिती दिली जाणार आहे. यासंदर्भात विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस टूरचे आयोजन…
विद्यापीठात कायमस्वरूपी यंत्रणा विकसित केली जाणार आहे. प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालील समिती असणार आहे. समितीच्या माध्यमातून अभियान राबवून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणाची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण राबविणार्या स्वायत्त महाविद्यालयांची विद्यार्थ्यांना कॅम्पस टूर घडवून आणली जाईल.